खामगावात लम्पी आजाराची जनावरे फिरताहेत ‘मोकाट’! प्रशासनाची उदासिनता कायम
By अनिल गवई | Published: September 27, 2022 01:37 PM2022-09-27T13:37:04+5:302022-09-27T13:37:43+5:30
Khamgaon News: खामगाव शहर आणि परिसरात लम्पी आजाराची जनावरे फिरत असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. त्यामुळे जनावरांचा कोविड अर्थातच लम्पी या आजाराबाबत खामगाव येथील पशुसंवर्धन विभाग फारसा गंभीर नसल्याचे दिसून येते.
- अनिल गवई
खामगाव: खामगाव शहर आणि परिसरात लम्पी आजाराची जनावरे फिरत असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. त्यामुळे जनावरांचा कोविड अर्थातच लम्पी या आजाराबाबत खामगाव येथील पशुसंवर्धन विभाग फारसा गंभीर नसल्याचे दिसून येते. पशुसंवर्धन विभागासोबतच या जनावरांकडे नगर पालिका प्रशासनानेही पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
गत १५ दिवसांपासून महाराष्ट्र राज्यात जनावरांच्या लम्पी आजाराने थैमान घातले आहे. बुलडाणा जिल्ह्यातही या आजाराचा वाढता प्रकोप आहे. मात्र, अशाही परिस्थितीत पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांच्या लम्पी आजाराला गांभीर्याने घेतले नसल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर येत आहे. लम्पी आजाराने ग्रस्त जनावरे खामगाव शहर आणि परिसरात चक्क मोकाट फिरताना आढळून येत आहेत. शहरातील शिवाजी नगर, शेगाव नाका, टॉवर चौक, फरशी, रायगड कॉलनी आणि बसस्थानक यासारख्या गर्दीच्या ठिकाणी लम्पीच्या जनावरांचा मुक्त संचार वाढला आहे. मात्र, पशुसंवर्धन विभागाकडून कोणत्याही प्रकारची दक्षता घेतली जात नसल्याचे दिसून येते. जनावरांमध्ये लम्पी आजाराची लागण मोठ्याप्रमाणावर झाली आहे, त्याठिकाणी क्वारंटाईन सेंटर (विलगीकरण कक्ष) उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या आदेशालाच खामगावात केराची टोपली दाखविण्यात येत असल्याचे चित्र आहे.
आयसोलेट करणे दूरच; लसीकरणही रखडले!
लम्पी आजाराचा प्रभाव आणखी वाढू नये, यासाठी बाधित जनावरांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवून लम्पीची लागण झालेल्या जनावरांना आयसोलेट करणे गरजेचे आहे. मात्र, खामगावात आयसोलेट करणे दूरच; बाधीत जनावरांचे लसीकरण आणि सर्वेक्षणही रखडले आहे.
लम्पीने बाधित झालेली जनावरे खामगावात मोकाट फिरत असल्याची माहिती मिळाली आहे. अशा जनावरांना वेगळे ठेवण्याच्या तोंडी सूचना नगर पालिका प्रशासनाला दिल्या आहेत.
-मंगेश खराटे
(पशुधन विकास अधिकारी, पशुसंवर्धन विभाग खामगाव)
लम्पी आजाराने बाधित जनावरे बुलडाणा आणि खामगावत फिरत असल्याची वस्तुस्थिती आहे. यासंदर्भात बुलडाणा नगर पालिकेशी लेखी पत्रव्यवहार केला आहे. मोकाट जनावरांवरील नियंत्रण हा पशुधन विभागाच्या अख्यारीतील विषय नाही. पालिकेने अशी जनावरे क्वारंटीन करावीत.
- राजेंद्र पाटील
पशुधन आयुक्त, बुलडाणा.