इलेक्ट्रीक चार्जिंग पॉंईंट देण्याचे आमिष, 26 लाखांची फसवणूक करणारी टोळी गजाआड
By भगवान वानखेडे | Published: September 13, 2022 07:22 PM2022-09-13T19:22:09+5:302022-09-13T19:22:21+5:30
इलेक्ट्रीक चार्जिंग पॉंईंटचे आमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी सक्रीय.
बुलढाणा: इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशन देण्याचे आमिष दाखवून जिल्ह्यातील तीन पोलीस स्टेशनमध्ये २६ लाखाची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी सायबर पोलिसांनी दिल्ली येथून पाच आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी सक्रीय असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
जिल्ह्यातील खामगाव शहर, किनगाव राजा, बुलडाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग पॉईंट देण्याच्या नावाखाली नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली होती. या फसवणुकीची रक्कम २६ लाख रुपये ऐवढी होती. याप्रकरणी सायबर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास करुन आरोपी गौरव रतनलाल शर्मा, संदीप लुलाराम, राहुल प्रसाद सुधीर प्रसाद, मानव क्रिष्णकुमार शर्मा, शेखर प्रकाशचंद शर्मा (सर्व रा.दिल्ली) या पाच जणांना अटक केली. या आरोपीकडून नगदी ७३ हजार ७८० रुपये तर बॅकेमध्ये गोठविण्यात आलेली २ लाख ६४ हजार ४९१ रुपये यासोबतच इतर साहित्य असा एकुण ५ लाख ४२ हजार २७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक बळीराम गिते, पोलीस निरीक्षक अनिल बेहेरानी यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक विलासकुमार सानप, दुर्गेश राजपुत, पोलीस अंमलदार ज्ञानेश नागरे, राजु आडवे, पवन मखमले, नंदकिशोर आंधळे, राजदीप वानखडे, आनंदा हिवाळे, कैलास ठोंबरे, नीलेश चाटे, अजीस परसुवाले, उषा वाघ व चालक अविनाश मुंढे, शोहेब अहमद यांनी केली.
अशी केली जाते फसवणूक
इलेक्ट्रो इव्ही पॉइंट घेणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फेक वेबसाईट तयार करुन त्याची सोशल मीडियावर जाहिरात केली जाते. चार्जींग स्टेशन घेण्यासाठी सरकारी अनुदानाबाबत आणि चार्जिंग पॉईंट घेणाऱ्या उमेदवारास भविष्यात होणाऱ्या फायद्याबाबत प्रलोभन दिले जातात. त्यासाठी ग्राहकांना कोणताही खर्च करण्याची आवश्यकता नाही, फक्त रजिस्ट्रेशन फी भरावी लागणार असल्याचे सांगुन ज्या व्यक्तीने रजिस्ट्रेशन फी भरलेली आहे त्यांची वेगवेगळ्या कारणासाठी डिस्कॉम फी, टॅक्स, जीएसटी टॅक्ससाठी बॅंकामध्ये पैसे भरण्याचे सांगतात. या प्रकारे ग्राहक जोपर्यंत पैसे भरत असतो तोपर्यंत त्यास पुन्हा पुन्हा रकमेची मागणी केल्या जाते.