माफियाने पथकाच्या ताब्यातून अवैध रेतीचा ट्रक पळवला; तलाठ्याला मारहाण
By सदानंद सिरसाट | Published: March 15, 2024 07:42 PM2024-03-15T19:42:16+5:302024-03-15T19:43:18+5:30
शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातून रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या माफियांनी पुन्हा उच्छाद मांडला आहे.
खामगाव-जलंब (बुलढाणा): शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातून रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या माफियांनी पुन्हा उच्छाद मांडला आहे. गुरुवारी रात्री १२ वाजता दरम्यान तलाठ्यांच्या चौघांच्या पथकाने खामगाव-जलंब रस्त्यावर पहुरजिरा रेल्वे गेटजवळ रेतीचे अवैध वाहन पकडले. यावेळी खामगावातील कुख्यात रेतीमाफिया घटनास्थळी आला. त्याने वाहनात बसलेल्या तलाठ्याला खाली खेचून चालकाला वाहन दामटण्याचे फर्मावले. तसेच कुणी मध्ये आल्यास उडवण्याचीही धमकी दिली. त्यामुळे या परिसरात पुन्हा माफियांचा उच्छाद सुरू झाल्याचे उघड होत आहे.
शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातून रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक करण्याचा खामगावातील माफियांचा धंदा तेजीत आहे. त्यासाठी विनाक्रमांकाच्या वाहनाचा वापर केला जातो. या वाहनांमुळे आतापर्यंत कठोरा, भास्तन, माटरगाव, जलंब, पहुरजिरा, वाडी या गावांतील अनेक नागरिकांचा बळी घेतला. तर अनेकांना हातपाय गमावण्याची वेळ आली. त्याविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, खासदार प्रतापराव जाधव, आमदार ॲड. आकाश फुंडकर, आमदार डॉ. संजय कुटे यांच्या उपस्थितीत समस्या मांडली होती. त्यावेळी तत्कालीन तहसीलदार समाधान सोनवणे यांच्या शंकास्पद कार्यपद्धतीची माहितीही दिली होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पोलिस आणि महसूल विभागाच्या पथकाची नियुक्ती केली. त्या पथकांना नदी घाटातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यावर पहारा देण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर फक्त काही दिवसातच माफियांचे कारनामे सुरू झाले. त्यामध्ये खामगावातील माफियांची संख्याच अधिक आहे. त्यांना प्रशासन, लोकप्रतिनिधीही आवरत नसल्याने सर्वसामान्यांचे जगणेच कठीण झाले आहे.
माफिया येताच चालकाला वाटले ‘हायसे’
याप्रकरणी ताब्यात घेतलेले रेतीचे वाहन तहसीलमध्ये जमा करण्यासाठी पथकातील ठाकरे नामक तलाठी वाहनाच्या केबिनमध्ये बसले. त्यावेळी चालकाने खामगावातील प्रशांत नामक रेतीमाफियाला माहिती दिली. तो तातडीने पोहचला. त्यावेळी वाहनचालकाला ‘हायसे’ वाटले. त्याने तलाठ्याला केबिनच्या खाली खेचले. तसेच चालकाला वाहन दामटण्याचे सांगितले. कुणी आडवा आल्यास उडवून टाक, असेही बजावले. उपस्थित तलाठी सदाशिव ठाकरे, आर.एम. ऐनवार, सचिन ढोकणे, वाल्मीकी वैद्य हे हताशपणे हा प्रकार पाहत होते. याप्रकरणी मंडळ अधिकारी देशमुख यांनी रात्रीच पोलिसात तक्रार देणे आवश्यक होते. मात्र, ते या प्रकारापासून नामानिराळे राहिले.
तहसीलदार बाजड यांना दिला अहवाल
या घटनेचा वृत्तांत असलेला अहवाल तलाठ्यांनी शुक्रवारी दुपारी तहसीलदार दीपक बाजड यांना दिला. त्यामध्ये अज्ञात क्रमांकाचे वाहन ताब्यात घेतले असता ते अज्ञातांनीच पळवून नेल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, मंडळ अधिकाऱ्यांसह तलाठ्यांना खामगावातील तो माफिया चांगलाच परिचित आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करून वाहन जमा करणे आवश्यक असताना वस्तुस्थिती तहसीलदारांपासून लपविण्याचा प्रकार घडला आहे.
पहुरजिरा परिसरातच मोठे साठे
खामगावातील या माफियाने शांतपणे पहुरजिरा परिसरातील शेतात मोठ्या प्रमाणात रेती साठे केले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्याला सोडून देण्यात आले. यावेळी तलाठ्यावर कोणाचा दबाव आला. तसेच माफियाचे काहीच वाकडे होत नसल्याने त्याची हिंमत वाढत असल्याचे काही तलाठ्यांनी सांगितले आहे.
संबंधित तलाठ्यांनी घटनेचा अहवाल दिला आहे. याप्रकरणी पुढील कारवाईसाठी पोलिसांना पत्र दिले जाणार आहे. तसेच पोलिसांचाही कारवाईमध्ये सहभाग घेतला जाईल. - दीपक बाजड, तहसीलदार, शेगाव.