शरद पवार यांनी फक्त घर भरण्याचे काम केले - अमित शाह
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 02:09 PM2019-10-11T14:09:32+5:302019-10-11T14:25:00+5:30
शरद पवार यांनी केवळ घर भरण्याचेच काम केले घणाघाती टीका अमित शाह यांनी शुक्रवारी चिखली येथे केली.
चिखली (बुलडाणा) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रासाठी काय केले, असा सवाल करत शरद पवार यांनी केवळ घर भरण्याचेच काम केले घणाघाती टीका अमित शाह यांनी शुक्रवारी चिखली येथे केली. त्यांचा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नव्हे तर परिवारवादी पार्टी असल्याचा टोलाही त्यांनी लगावला
शरप पवारांनी केलेल्या कामापेक्षा आम्ही पाच वर्षांत केलेली कामांची यादी सांगायची झाल्यास आम्हाला सात दिवस भाागवत सप्ताह सारखा सप्ताह घ्यावा लागेल,असे अमित शाह यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या काळात महाराष्ट्र शिक्षण, कृषी, उद्योग यामध्ये आघाडीवर होता. मात्र, त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आले आणी महाराष्ट्राचा दर्जा खाली गेला. परंतू गेल्या पाच वर्षात राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने आणि केंद्रातील मोदी सरकारमुळे पुन्हा देशात महाराष्ट्राचा विकास वेगाने होत आहे. मोदी सरकार आल्यानंतर सर्वात मोठा निर्णय झाला तो, म्हणजे कश्मिरमधील कलम ३७० हटविण्याचा. परंतू यावरही अनेक विरोधकांनी आवाज उठवला. हे कलम हटविल्यास काश्मिरमध्ये रक्ताचे पाट वाहतील असे काँग्रेसचे गुलाम नबी म्हटले होते, परंतू रक्ताचे पाट तर दूरच एक थेंबही रक्त याठिकाणी वाहिले नाही. कलम ३७० हटविण्यामागे महाराष्ट्राचा काय फायदा, असे अनेक प्रश्न विचारले गेले. परंतू देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने हे महत्त्वपूर्ण होते. आम्हाला देशाची सुरक्षा महत्त्वाची आहे, काश्मिर हे भारत देशाचा मुकूट आहे, असेही अमित शाह यावेळी म्हणाले.
देशात महाराष्ट्र नंबर एक बनवणार
शाह म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना एकाही मुख्यमंत्र्याने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नव्हता. केंद्रातील काँग्रेस सरकारने कायम राज्यातला मुख्यमंत्री बदलण्याचे काम केले. मात्र, तु्म्ही फडणवीसांना निवडून दिले आणि मोदींनी त्यांना पाच वर्षे काम करण्याची संधी दिली. पुढील पाच वर्षामध्ये देशात महाराष्ट्र नंबर एक बनवणार असल्याचेही शाह यांनी सांगितले.