शिवसेना, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या अस्तित्वाची लढाई; भाजपला पत कायम राखण्याचे आव्हान

By निलेश जोशी | Published: October 25, 2024 01:59 PM2024-10-25T13:59:55+5:302024-10-25T14:04:50+5:30

भाजपला या निवडणुकीत पत कायम राखण्यासाठी लढावे लागणार आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Both factions of Shiv Sena and NCP battle for existence so challenge to BJP to maintain win | शिवसेना, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या अस्तित्वाची लढाई; भाजपला पत कायम राखण्याचे आव्हान

शिवसेना, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या अस्तित्वाची लढाई; भाजपला पत कायम राखण्याचे आव्हान

संदर्भासहित... जिल्हा बुलढाणा, नीलेश जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, बुलढाणा: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी असली तरी शिंदेसेना, उद्धवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. सोबतच भाजपला या निवडणुकीत पत कायम राखण्यासाठी लढावे लागणार आहे.

निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपने चार जागांपैकी जळगाव जामोद, खामगाव आणि चिखली येथे विद्यमान आमदारांना उमेदवारी घोषित केली आहे. गतवेळी मलकापूरमधून पराभूत झालेले चैनसुख संचेती हे पुन्हा रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यांना स्थानिक नेत्यांकडून विरोध होत असल्याने पक्षश्रेष्ठी त्यांच्या नावाबाबत संभ्रमात असल्याचे बोलल्या जात आहे. येथून मनीष लखानीही इच्छुक आहेत. येथील वाद दिल्लीपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तोडगा न निघाल्यास येथे बंडखोरीची शक्यता आहे.

शिंदेसेनेने बुलढाणा आणि मेहकर येथील विद्यमान आमदारांना संधी दिली आहे. सिंदखेड राजा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार गटाची कास धरली. त्यामुळे महायुतीत येथे भाजप व शिंदेसेनेतील इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. महाविकास आघाडीत जळगाव जामोद, बुलढाणा येथे जागा वाटपावरून काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धवसेनेमध्ये वाद आहे. त्यातून प्रसंगी बंडखोरीची शक्यता असल्याचे वर्तमान चित्र आहे. उर्वरित चार जागा काँग्रेसच्या वाट्याला आहेत; परंतु काँग्रेसकडून अद्याप उमेदवारांची घोषणा झालेली नाही.

बुलढाण्यात क्रांतिकारी शेतकरी संघटना आव्हान उभे करू शकते. वंचित बहुजन आघाडीने सिंदखेड राजा, मेहकर आणि मलकापूरमध्ये उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचेही आव्हान महायुती व महाविकास आघाडीसमोर असेल.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

  • शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पीक विम्याचा प्रश्न जिल्ह्यात गंभीर आहे.
  • सातपुड्याच्या पट्ट्यात बालमृत्यू व साथरोगांवरील नियंत्रणाची समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न गरजेचे
  • जिल्ह्याचा आठ हजार कोटींच्या सिंचन अनुशेषाचा मुद्दा निवडणुकीत गाजण्याची शक्यता आहे.
  • मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासह मतविभाजन हा जिल्ह्यातील निवडणुकीत कळीचा मुद्दा राहू शकतो.
  • लोणार विकास आराखा, जिगावसह जिल्ह्यातील इतर रखडलेले प्रकल्प, प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाचे प्रश्न.


६५% - मतदान २०१९ मध्ये विधानसभेसाठी होते
५९ - उमेदवारांनी गेल्या निवडणुकीत जिल्ह्यात नशीब आजमावले
४८ - उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते

जिल्ह्यातील विधानसभांचे चित्र असे

विधानसभा मतदारसंघ    मतदान    विद्यमान आमदार     पक्ष    मिळालेली मते

  • मलकापूर    ६८.९०%     राजेश एकडे     काँग्रेस    ८६,२७६
  • बुलढाणा     ५७.५७%    संजय गायकवाड     शिवसेना    ६७,७८५
  • चिखली    ६५.४९%    श्वेता महाले     भाजप    ९३,५१५
  • सिंदखेड राजा    ६४.००%    डॉ. राजेंद्र शिंगणे     राष्ट्रवादी काँग्रेस    ८१,७०१
  • मेहकर    ५९.२३%     संजय रायमुलकर     शिवसेना    १,१२,०३८
  • खामगाव    ७०.३९%     आकाश फुंडकर     भाजप    ९०,७५७
  • जळगाव जामोद    ७०.०३%      डॉ. संजय कुटे    भाजप    १,०२,७३५

Web Title: Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Both factions of Shiv Sena and NCP battle for existence so challenge to BJP to maintain win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.