आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीत महाराष्ट्रातील मुलांची कमाल; ऐतिहासिक कामगिरीने वेधले लक्ष 

By निलेश जोशी | Published: October 5, 2023 06:07 PM2023-10-05T18:07:45+5:302023-10-05T18:07:58+5:30

भारतीय संघामधील महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंनी पात्रता फेरीच्या सामन्यांपासून आपला खेळ उंचावत नेत प्रतिस्पर्धी संघांना डोके वर काढू दिलेले नाही.

Maharashtra boys top in archery at Asian Games historic performance drew attention | आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीत महाराष्ट्रातील मुलांची कमाल; ऐतिहासिक कामगिरीने वेधले लक्ष 

आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीत महाराष्ट्रातील मुलांची कमाल; ऐतिहासिक कामगिरीने वेधले लक्ष 

googlenewsNext

बुलढाणा : जागतिक स्तरावर तिरंदाजीमध्ये एक महाशक्ती म्हणून भारताचा संघ सध्या लौकिक पावत असून ५ ऑक्टोबर रोजी भारतीय तिरंदाजांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत केलेली कामगिरी ही देशाच्या दृष्टीने जशी ऐतिहासिक आहे तशीच ती महाराष्ट्राच्या दृष्टीनेही ऐतिहासिक ठरली आहे. कारण भारतीय संघामधील महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंनी पात्रता फेरीच्या सामन्यांपासून आपला खेळ उंचावत नेत प्रतिस्पर्धी संघांना डोके वर काढू दिलेले नाही.

त्यातच ४ ऑक्टोबरला नागपूरच्या अेाजस देवतळे आणि ज्योती सुरेखा वेण्णम यांनी कम्पाऊंट मिश्र प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्ण पदकावर नाव कोरेल आहे. या खेळाडूंच्या कामगिरीमुळे भारतीय तिरंदाजी संघात संचारलेला उत्साह पाहता ५ ऑक्टोबर रोजी भारताच्या पुरुष व महिला तिरंदाजांनी कमाल करत सुवर्ण पटकावले. त्यामुळे तिरंदाजीच्या दृष्टीने ५ ऑक्टोबरचा दिवस एक ऐतिहासिक दिवस ठरला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेचा विचार करता या संघात महाराष्ट्रातील महिला व पुरुष मिळून तीन खेळाडू सहभागी आहेत. 

सुवर्ण पदकाच्या कमाईत त्यांचे योगदान हे ऐतिहासिक असून महाराष्ट्राच्या तिरंदाजीच्या इतिहासातील हे एक सुवर्ण पान म्हणावे लागले. यामध्ये साताऱ्याची सामान्य घरातून आलेली आदिती स्वामी, नागपूरचा अेाजस देवतळे आणि बुलढाण्याचा अगदीच सामान्य कुटुंबातून आलेला प्रथमेश जावकार यांचा समावेश आहे.
कम्पाऊंड प्रकारात भारताचा संघ हा जागतिक क्रमावारीत पहिल्या स्थानावर आहे. त्यामुळे उपांत्य सामन्यासह अंतिम सामन्यातही पुरुष संघाने अपेक्षेप्रमाणे एकतर्फी विजय मिळविला. त्यामुळे महाराष्ट्रात बुलढाणा, साताऱ्यासह नागपूरमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. अेाजस देवतळेनेतर कमाल केली आहे. आतापर्यंत त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीत दोन सुवर्णांची कमाई केली आहे. दरम्यान मिळालेले हे यश सांघिक कामगिरीचा उत्कृष्ट नमुना असल्याचे भारताचे पुर्वाश्रमीचे प्रशिक्षक चंद्रकांत इलग यांनी स्पष्ट केले. मेहनतीशिवाय पर्याय नाही. हे या मुलांनी सिद्ध केल्याचे ते म्हणाले.

 तिरंदाजीत भारताची आणखी दोन पदके निश्चित 
आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी क्रीडा प्रकारात भारताची आणखी दोन पदके निश्चित झालेली आहे. ७ ऑक्टोबरला वैयक्तिक बाद फेरीचा अंतिम सामना आहे. गंमत म्हणजे यामध्ये भारताचा दिल्लीचा अभिषेक वर्मा आणि नागपूरच्या तेजस देवतळेमध्ये सुवर्ण पदकासाठी सामना रंगणार आहे. त्यामुळे या सामन्याचा निकाल दोघापैकी कोणाच्याही एकाच्या पक्षात गेला तरी भारतासाठी सुवर्ण आणि रजत पदक निश्चितच झालेले आहे.
 

Web Title: Maharashtra boys top in archery at Asian Games historic performance drew attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.