महाराष्ट्र निवडणूक २०१९ : मलकापूर मतदारसंघात मतदारांमध्ये उत्साह!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 01:45 PM2019-10-21T13:45:27+5:302019-10-21T13:45:33+5:30
Maharashtra Election 2019 : मलकापूरमध्ये दुपारी अकरा वाजेपर्यंत जवळपास 14.78 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे
मलकापूर - मलकापूर विधानसभा मतदार संघातील एकूण 11 उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असणारी निवडणूक प्रक्रिया मतदान केंद्रांवर सकाळी 7 वाजता सुरू झाली असून दुपारी अकरा वाजेपर्यंत जवळपास 14.78 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. युवक, महिलांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून येत आहे. निवडणूक सर्वत्र शांततेत पार पडावी या अनुषंगाने मतदारसंघातील तीनशे मतदान केंद्रांवर प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला असून यंत्रणा सज्ज आहे. मतदारसंघात निवडणूक रिंगणात एकूण 11 उमेदवार उतरले असले तरी खरी लढत भाजपाचे उमेदवार चैनसुख संचेती व काँग्रेसचे उमेदवार राजेश एकडे यांच्यात होणार आहे.
या वेळेची लढत ही अत्यंत चूरशीची असून भाजपा व काँग्रेस या दोन्ही पक्षाकरीता प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते बूथ प्रमुख हे मतदारांना मतदान केंद्रावर जाण्याकरिता सहकार्य करीत आहे. किंबहुना घरात बसू नका आपले अमूल्य मतदान लवकर करा असे आवाहन संवादातून केले जात आहे.सकाळी सात वाजेपासून मलकापूर विधानसभा मतदार संघातील 300 केंद्रांवर दुपारी अकरा वाजेपर्यंत जवळपास 14.78 टक्के मतदान झाले असून सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असल्याच्या बाबीला निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून सुद्धा दुजोरा मिळाला आहे.
मुंबई शहर जिल्हा सकाळी 7 ते 11 या दरम्यान सरासरी 13 टक्के मतदान. https://t.co/ADLyGwiPFZ
— Lokmat (@MiLOKMAT) October 21, 2019
महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरच्या 13व्या विधानसभा निवडणुकीसाठी आज सोमवारी, 21 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. या मत प्रक्रियेमध्ये सुमारे 9 कोटी मतदार 3237 उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणार आहेत. राज्यात एकूण 8,98,39,600 मतदार असून यामध्ये 4,68,75,750 पुरुष, 4,28,43,635 महिला, 3,96,000 दिव्यांग, 1,17,581 सर्व्हिस मतदार आणि 2,634- तृतीयपंथी मतदार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडावी, यासाठी आयोगाने केंद्रीय, तसेच राज्य राखीव दलाची मदत घेतली असून, राज्य पोलीस दलातील सुमारे 40 हजार कर्मचारी आणि अधिकारी बंदोबस्तावर असतील. मतदान केंद्राचा परिसर आणि स्ट्राँगरूमच्या बाहेर चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अचानक उद्भवलेला प्रसंग निस्तारण्यासाठी रॅपिड अॅक्शन फोर्स तयार ठेवण्यात आला आहे. मतदान केंद्राच्या परिसरात ड्रोन उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे, तसेच केंद्राच्या आतमध्ये मोबाइल नेण्यास मनाई करण्यात आली आहे.