Maharashtra Election 2019 : बुलडाण्यात दोन मतदारसंघात बंडखोरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 02:45 PM2019-10-05T14:45:37+5:302019-10-05T14:45:41+5:30

बुलडाणा आणि जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात युतीत आणि आघाडीसोबतच वंचित बहुजन आघाडीमध्येही बंडखोरी झाल्याचे समोर आले आहे.

Maharashtra Election 2019: Rebellion in two constituencies in Buldana! |  Maharashtra Election 2019 : बुलडाण्यात दोन मतदारसंघात बंडखोरी!

 Maharashtra Election 2019 : बुलडाण्यात दोन मतदारसंघात बंडखोरी!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: महाराष्ट्र विधानसभेच्या बुलडाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघातील निवडणूक लढतीचे चित्र अताा स्पष्ट होण्यास प्रारंभ झाला असून प्रत्यक्ष निवडणूक रिंगणातील उमेदवार हे सात आॅक्टोबर रोजी स्पष्ट होतील. दरम्यान बुलडाणा आणि जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात युतीत आणि आघाडीसोबतच वंचित बहुजन आघाडीमध्येही बंडखोरी झाल्याचे समोर आले आहे.
बुलडाण्यात तर ३५ वर्षे शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्या माजी आमदार विजयराज शिंदे यांनी पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून वंचित बहुजन आघाडीची कास धरली आहे. दुसरीकडे बुलडाण्यातच भाजपला जागा न सुटल्यामुळे नाराज झालेले योगेंद्र गोडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत बंडखोरीचे निशान फडकवले आहे. या दोघांचाही पवित्रा चांगलाच आक्रमक आहे.
दरम्यान जळगाव जामोदमध्ये कांग्रेस उमेदवार स्वाती वाकेकर यांच्या विरोधातच काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी प्रसेनजीत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरी केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याअगोदर त्यांनी रितसर एक बैठक घेऊन आपल्या बंडाची तिव्रता स्पष्ट केली होती. त्यानुषंगाने त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
जळघाव जामोदमध्येच वंचित बहुजन आघाडीमध्येही बंडखोरीचे झाल्याचे चित्र आहे. वंचित बहुजन आघाडीने प्रारंभी येथे शरद बनकर यांच्या रुपाने उमेदवार दिला होता. मात्र दोन दिवसापूर्वी बुलडाण्यात झालेल्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संगितराव भोंगळ पाटील यांनी वंचितमध्ये प्रवेश करत येथील उमेदवारीवर दावा सांगितला होता. तसा उमेदवारी अर्ज त्यांनीही दाखल केला आहे. येथे वंचितकडून दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. या मतदारसंघात त्यामुळे मतविभाजनाचा फटका नेमका कोणाला बसणार हा कळीचा मुद्दा बनला आहे.
एकीकडे काँग्रेसमध्ये बंडखोरी झालेली असतानाच वंचित बहुजन आघाडीमध्येही बंडखोरी झाल्याचे चित्र आहे.
त्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या बंडखोरांना थांबविण्यासाठी आता आघाडी, युती आणि वंचित बहुजन आघाडीचे शिर्षस्थ नेते कोणत्या हालचाली करतात याकडे लक्ष लागून राहले आहे.
सात आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. प्रत्यक्षात या दिवशी जिल्ह्यातील निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे बुलडाणा आणि जळगाव जामोदमध्ये झालेली बंडखोरी थांबविण्यासाठीची आशा उभय पक्षांमध्ये आहे.
दुसरीकडे मेहकरमध्ये शिवसेनेचे डॉ. संजय रायमुलकर आणि काँग्रेसचे अ‍ॅड. अनंत वानखेडे यांच्या दुरंगी, सिंदखेड राजातही शिवसेनेचे डॉ. शशिकांत खेडेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यात सरळ लढत आहे तर चिखलीतही भाजपच्या श्वेता महाले विरुद्ध काँग्रेसचे विद्यमान आमदार राहूल बोंद्रे यांच्यात अतितटीची लढत होत आहे. मलकापुरातही दुहेरी लढतीचे संकेत आहेत.
(प्रतिनिधी)

Web Title: Maharashtra Election 2019: Rebellion in two constituencies in Buldana!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.