Maharashtra Election Voting Live : ‘आधी मतदान, नंतर लग्न’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 03:53 PM2019-04-18T15:53:32+5:302019-04-18T15:53:52+5:30
बुलडाणा: लोकशाही बळकटीकरणाच्या दृष्टीकोनातून बुलडाणा लोकसभा मतदार संघातील नवरदेवांचा पुढाकार कौतुकास्पद ठरत आहे.
बुलडाणा: लोकशाही बळकटीकरणाच्या दृष्टीकोनातून बुलडाणा लोकसभा मतदार संघातील नवरदेवांचा पुढाकार कौतुकास्पद ठरत आहे. १८ एप्रिल रोजी लग्न असलेल्या लोकसभा मतदार संघातील आठ नवरदेवांनी मतदानाला महत्त्व देऊन आधी मतदान नंतर लग्नाला गेल्याचे चित्र दिसून आले.
सध्या निवडणुकांबरोबरच लग्नाचाही हंगाम जोरात आहे. लोकशाहीतील सर्वात मोठा उत्सव म्हणजेच निवडणूक. लोकशाहीच्या या उत्सवात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे, म्हणून निवडणूक आयोगाने अभिनव उपक्रमही राबविले. उपक्रमाचे फलीत म्हणून बुलडाणा लोकसभा मतदार संघांतील युवकांनी लग्नापेक्षा मतदानाला महत्त्व दिल्याचे उदाहरण सहा ठिकाणी समोर आले आहे. नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा केला आहे. आठ नवदेवांनी आज लग्नाच्या दिवशी घाईगडबड असतानाही सकाळी मतदान केंद्रावर जात मतदान केले. विशेष म्हणजे मतदान करताना सर्वांनी नवरदेवाचा पोषाख घातला होता. मतदान हे आपले कर्तव्य आहे. ते प्रत्येकाने बजावले पाहिजे, असा संदेश या नवरदेवांनी दिला आहे.
या नवरदेवांनी केले मतदान
मेहकर तालुक्यातील ऊमरा देशमुख येथील अभिमन्यू वसंतराव देशमुख, बह्मपुरी येथील करण कुरळकर, सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी येथील बाळासाहेब देशमुख, जानेफळ येथील सागर मुरडकर, सावखेड नागरे येथील सचिन जायभाये व हिवरा खु. येथील एका युवकाने लग्नाला जाण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला. तसेच खामगाव तालुक्यातील बोरजवळा येथील रविंद्र प्रकाश मुºहे व पाळा येथील नवरदेव दत्ता संजय गावडे याने बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदान केले.