Maharashtra government : राजेंद्र शिंगणे, संजय रायमुलकरांना मंत्रीपदाची संधी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 18:04 IST2019-11-29T18:03:31+5:302019-11-29T18:04:05+5:30
डॉ. राजेंद्र शिंगणे आणि शिवसेनेचे डॉ. संजय रायमुलकर यांना मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिल्या जात आहे.

Maharashtra government : राजेंद्र शिंगणे, संजय रायमुलकरांना मंत्रीपदाची संधी!
- नीलेश जोशी
लोकमत विशेष
बुलडाणा: महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आणि सहा मंत्र्यांचा २८ नोव्हेंबर रोजी शपथविधी झाल्यानंतर आता मंत्रीमंडळ विस्ताराचे वेध लागले असून विश्वासदर्शक ठराव पारीत झाल्यानंतर प्रत्यक्षात महाविकास आघाडीचे मंत्रीमंडळ अस्तित्वात येणार आहे. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि शिवसेनेचे डॉ. संजय रायमुलकर यांना मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिल्या जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे बुलडाणा जिल्ह्याचे सर्वेसर्वा डॉ. राजेंद्र शिंगणे यांना जवळपास दहा वर्षे कॅबीनेट मंत्रीपदी काम करण्याचा अनुभव असल्याने त्यांची दावेदारी ही अधिक प्रबळ आहे. शालेय शिक्षण, महसूल, क्रीडा, मदत व पुनर्वसन, माहिती व जनसंपर्क या राज्यमंत्रीपदासह आरोग्य खात्याचे कॅबीनेट मंत्रीपदाचा तगडा अनुभव त्यांना आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांचे मंत्रीपद जवळपास निश्चित मानल्या जात आहे. गेली तीस वर्षे ते राजकारण सक्रीय असून लोकसभा निवडणुकीमध्ये २००९ आणि २०१९ मध्ये पराभव होऊनही त्यांनी आपले जिल्ह्यातील राजकीय अस्तित्व प्रकर्षाने अधोरेखीत केले आहे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय तथा निष्ठावान म्हणून ते ओळखल्या जातात. अमरावती विभागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आलेल्या दोन आमदारांमध्येही ते जेष्ठ आहेत.
दुसरीकडे पश्चिम वºहाडात शिवसेनेच्या असलेल्या तीन आमदारांमध्ये सर्वात अनुभवी व जेष्ठ असलेले मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांचीही प्रसंगी मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. अलिकडील काळात आ. डॉ. रायमुलकर आणि बुलडाण्याचे आ. संजय गायकवाड यांचे शिवसेनेचे नेते तथा मंत्रीपदाची शपथ घेतलेले एकनाथ शिंदे यांच्याशी जवळचे संबध असल्याचे सांगण्यात येत असून त्यांच्यासोबत त्यांचा अलिकडील काळात वावर दिसून आला आहे. त्यामुळे प्रसंगी आ. रायमुलकर यांची मंत्रीमंडळात वर्णी लागल्यास नवल वाटायला नको.