कोरोनामुळे महाशिवरात्री उत्सव रद्द!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 12:10 PM2021-03-10T12:10:56+5:302021-03-10T12:11:08+5:30
Mahashivaratri celebrations canceled शिवमंदिरात होणारा महाशिवरात्री उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमिवर रद्द करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: मेहकर तालुक्यातील मोळी येथील शिवमंदिरात होणारा महाशिवरात्री उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमिवर रद्द करण्यात आला आहे. मोळी येथे महाशिवरात्रीला शिव-पार्वतीच्या लग्नाची परंपरा अनेक पिढ्यांपासून जपली जाते. या हा कार्यक्रम मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत अगदी साधेपणाने पार पडणार आहे. यंदा महाप्रसादाची परंपरा खंडित होणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शिवमंदिरांमध्ये ११ मार्चला होणारा महाशिवरात्री उत्सवही रद्द करण्यात आला आहे. मेहकर तालुक्यातील मोळी येथे कुठलेच निमंत्रण नसतानाही हजारोंच्या संख्येने शिव-पार्वतीच्या लग्नाला वऱ्हाडी मंडळी येतात. शिवचंद्रमोळी येथे आजही महाशिवारात्रीला शिव-पार्वतीचे विधिवत लग्न लावले जाते. देवाच्या या लग्नाचे साक्षीदार होण्यासाठी भाविकांची १०० पेक्षा अधिक गावांतून शिवमंदिरात एकच गर्दी जमते. मंगलाष्टक म्हणून शिव-पार्वतीचे लग्न लावण्याची ही प्रथा शिवचंद्र मोळीवासी कित्येक वर्षांपासून जपत आहेत. अगदी पारंपरीक पद्धतीने आंतरपाठ व मंगलाष्टकांसह महादेवाचे पार्वतीशी लग्न लावणे हा या सोहळ्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे. मोळी येथील शिवमंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीला विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. महाशिवरात्रीला अखंड हरिनाम सप्ताह, भागवद् कथा वाचन, दररोज कीर्तन, शिवपुराण वाचण्यात येते. परंतु यंदा कोरोनामुळ सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती शिवचंद्र मोळी संस्थानचे अध्यक्ष संदीप नागरिक यांनी दिली.
शिवपार्वती विवाह होणार साधेपणाने!
शिवपार्वतीचा विवाह हा कमी भाविकांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने होणार आहे तसेच महाशिवरात्रीला विधिवत पूजन, महाआरतीही अत्यंत कमी भाविकांच्या उपस्थितीतच करण्यात येणार आहे. यावेळी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्देशित सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे.