मेहकर कृऊबास निवडणुकीत महाविकास आघाडीला झटका
By ब्रह्मानंद जाधव | Published: April 18, 2023 04:46 PM2023-04-18T16:46:01+5:302023-04-18T16:46:29+5:30
नामनिर्देशन नामंजूरमुळे महाविकास आघाडाली बाजार समिती निवडणूकीत पहिलाच झटका बसला आहे.
मेहकर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडी आणि शिंदे गटात रंगतदार ठरत हे. परंतू शिवसेना आणि काँग्रेसच्या दोन उमेदवारांचे नामनिर्देशन नामंजूर केले आहेत. त्यामध्ये आशिष रहाटे यांचाही समावेश आहे. नामनिर्देशन नामंजूरमुळे महाविकास आघाडाली बाजार समिती निवडणूकीत पहिलाच झटका बसला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. नामनिर्देशन पत्राच्या छाणनीमध्ये शिवसेनेचे बुलढाणा उपजिल्हाप्रमुख प्रा. अशिष रहाटे यांचे नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी मेहकर यांनी मंजूर केले होते. मात्र प्रा. अशिष रहाटे व त्यांच्या नामनिर्देशन पत्रावर विरोधी पॅनलच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे अपिलद्वारे हरकत घेतली. त्यावर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी शिवसेनेचे प्रा. अशिष रहाटे व काँग्रेसचे प्रा. सतीष ताजने हे १०० टक्के शासन अनुदानित शिक्षण संस्थेमधील कर्मचारी आहेत. या कारणावरून या दोन्ही नेत्यांचे नामनिर्देन पत्र नामंजूर करण्यात येत असल्याचा आदेश दिला आहे. शिवसेनेचे युवा नेते म्हणून प्रा. अशिष रहाटे यांच्या नेतृत्वात नुकताच मेहकर अर्बन बँकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकविण्यात आला आहे. महाविकास आघाडीची बाजार समिती निवडणूकीची जोरदार तयारी सुरू असतानाच नामनिर्देशन पत्र नामंजूर झाल्याने राजकीय वातावरण अधिकच गरम झाले आहे.
पराभवाच्या भीतीने नामनिर्देशन पत्रावर घेतली हरकत : आशिष रहाटे
कृषी उत्पन्न बाजार समिती मेहकरच्या संचालक मंडळाविषयी शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. जनता त्यांना कंटाळलेली आहे. शिवसेनेची ताकद मतदारसंघात वाढत चालली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पराभवाच्या भीतीने माझ्या नामनिर्देशन पत्रावर हरकत घेऊन कृऊबास निवडणूकीत रोखण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रतिक्रिया प्रा. अशिष रहाटे यांनी 'लोकमत'कडे १८ एप्रिल रोजी व्यक्त केल्या.