दुसरबीडमध्ये प्रथमच येणार महिलाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:29 AM2021-01-13T05:29:37+5:302021-01-13T05:29:37+5:30
दुसरबीड : सिंदखेड राजा तालुक्यातील सर्वांत मोठी असलेली ग्रामपंचायत म्हणून दुसरबीड ग्रामपंचायत ओळखली जाते. ग्रामपंचायतीमध्ये सहा वाॅर्ड ...
दुसरबीड : सिंदखेड राजा तालुक्यातील सर्वांत मोठी असलेली ग्रामपंचायत म्हणून दुसरबीड ग्रामपंचायत ओळखली जाते. ग्रामपंचायतीमध्ये सहा वाॅर्ड असून १७ सदस्य आहेत. नेहमीप्रमाणे या ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप-शिवसेना यांच्या पॅनलमध्ये लढत हाेते. यावर्षी ३३ उमेदवारांपैकी २५ उमदेवार महिला असल्याने ग्रामपंचातीमध्ये महिलाराज येणार आहे.
एक जागा अविराेध झाल्याने उर्वरित १६ जागांसाठी ३३ उमदेवार रिंगणात आहेत. दोन्ही पॅनलच्या वतीने ३२ उमेदवार रिंगणात असून, एक अपक्ष महिला उमेदवार आपले नशीब आजमावत आहे. एकूण ३३ उमेदवारांपैकी २५ उमेदवार महिला असून फक्त आठ पुरुष उमेदवार दोन्ही पॅनलकडून चार-चार प्रमाणे निवडणूक लढविणार आहेत. एवढ्या मोठ्या ग्रामपंचायतमध्ये एवढ्या संख्येने महिला उमेदवार उभे राहण्याची ही पहिली वेळ आहे.या ग्रामपंचायतवर लक्ष असलेल्या लोकांचा चर्चेचा विषय झाला आहे. यापूर्वी पुरुषांच्या हातात ग्रामपंचायत देऊनसुद्धा दुसरबीड गावचा विकास होऊ शकलेला नाही हे बोचणारे शल्य या रणरागिनींनी हेरले. यावेळेस ग्रामपंचायत महिलांनी लढायची व समस्यांवर तोडगा काढायचा अशा उदात्त हेतूने दुसरबीड गावातील रणरागिनींनी निवडणुकीचे मैदान गाठले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाजूने निवडणूक लढणारी वाॅर्ड क्रमांक सहामधील महिला उमेदवार अविरोध झाली आहे. निवडणुकीच्या प्रचारामध्ये भेटीगाठी घेण्याकरिता दोन्ही पॅनलचे उमेदवार व पॅनलप्रमुख जिवाचा आटापिटा करीत आहे. राजकारणाचे केंद्र मानले जाणारे व तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या दुसररबीडमध्ये महिलाराज येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.