बोगस बीटी बियाण्याच्या संशयावरून महिको कंपनीला सील
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2017 10:14 AM2017-12-09T10:14:16+5:302017-12-09T10:14:26+5:30
बोगस बीटी बियाण्याच्या संशयावरून तालुक्यातील धानोरा येथील महिको कंपनीला पोलिसांनी सील केले. पोलिसांनी शुक्रवारी रात्री ही कारवाई केली.
संदीप गावंडे/योगेश फरपट
नांदुरा / खामगाव : बोगस बीटी बियाण्याच्या संशयावरून तालुक्यातील धानोरा येथील महिको कंपनीला पोलिसांनी सील केले. पोलिसांनी शुक्रवारी रात्री ही कारवाई केली. राज्यात सर्वत्र बोगस बियाण्याच्या तक्रारी होत आहेत. कृषी विभागाच्या वतीने बियाणे कंपन्यांची पाठराखण होत असल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. धानोरा येथील महिको कंपनीतुन बोगस बियाणे निघत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे खामगावचे अप्पर पोलीस अधिक्षक श्याम घुगे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी रात्री 10.30 वाजता या कंपनीला तात्पुरते सील करण्यात आले आहे. पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. खामगाव व बुलढाणा पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. कृषी विभागाच्या मदतीने नमुने घेण्यात येत आहेत.
नेहमीप्रमाणे सकाळी 8 वाजता कंपनीत कामावर येणाऱ्या कामगारांना पोलिसांनी आत जाऊ दिले नाही. या कारवाईत आम्हाला सहभागी करून घेतले नाही असे सांगत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांवर ताशेरे ओढले.
या कारवाईत माझा समावेश नसून वरिष्ठांनी कारवाई केली, मी काही सांगू शकत नाही असं एसडीपीओ गिरीश बोबडे यांनी सांगितलं आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर महिको कंपनीला तात्पुरते सील लावण्यात आले आहे. पुढील कारवाई सुरू आहे अशी माहिती खामगावचे अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांनी दिली आहे.