खामगावातील गुटखा जप्ती कारवाईत सुत्रधार मोकाट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 11:19 AM2020-08-18T11:19:16+5:302020-08-18T11:19:27+5:30
अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
- अनिल गवई।
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: खामगावातील एमआयडीसीत जप्त करण्यात आलेल्या प्रंतिबंधित गुटखा प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळण्याची दाट शक्यता आहे. याप्रकरणी सुत्रधाराला सोडून मजूरावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या कारवाई विरोधात जिल्हाप्रशासनासोबतच न्यायालयात नाराजी याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्री, साठा, वाहतूक, वितरण आणि उत्पादन यावर अन्न सुरक्षा आयुक्त अन्न व औषध प्रशासन मुंबई यांच्या १५ जुलै २०१४ च्या अधिसुचनेद्वारे प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्याचप्रमाणे देशातही तंबाखू मिश्रीत गुटखा विक्रीस बंदी आहे. मात्र, अशाही परिस्थितीत चोरट्या मार्गाने शहरात गुटख्याची विक्री, साठा, वाहतूक, वितरण आणि उत्पादनही सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. दरम्यान, ७ आॅगस्ट रोजी खामगाव येथील एमआयडीसीतील एका गोदामात चक्क ३४ लक्ष रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी एका मजुरावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई चुकीच्या पध्दतीने झाल्याने, याप्रकरणी खामगाव जिल्हा सत्र न्यायालयात नाराजी याचिका दाखल करण्यात आली आहे.
जिल्हा सत्र न्यायालयात ‘नाराजी पिटीशन’!
खामगाव एमआयडीसीत ७ आॅगस्ट रोजी शासनाने प्रतिबंध केलेला आणि मानवी आरोग्यास घातक असलेला ४६ पोते आणि १८ कट्ट्यांमध्ये असलेला ३४ लक्ष रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. यामध्ये राजू श्याम गव्हांदे रा. शंकर नगर खामगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, राजू गव्हांदे यास जामीन नाकारण्यात यावा, तसेच मुख्य सुत्रधाराला आरोपी करण्यात यावे यासाठी खामगाव जिल्हा सत्र न्यायालयात जामीन नाकारण्याचा अर्ज (नाराजी पिटीशन) अॅड. एस. डब्ल्यू. शेगोकार यांच्यामार्फत दाखल करण्यात आले. या अर्जावर १९ आॅगस्ट रोजी सुनावनी होणार आहे.
खामगाव येथील एमआयडीसीतील एका गोदामात जप्त करण्यात आलेल्या गुटखा साठ्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पोलिस प्रशासनाच्यावतीने संयुक्त कारवाई करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी पुढील कारवाई केली.
-प्रदीप पाटील
एसडीपीओ, खामगाव.