राज्यातील साडेसात लाख हेक्टरवरील मका पीक धोक्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 02:49 PM2019-08-07T14:49:49+5:302019-08-07T14:49:53+5:30
राज्यातील मका पिकावर ‘अमेरिकन लष्करी अळी’चे संकट आले आहे. त्यामुळे राज्यातील सात लाख ४९ हजार ४७२ हेक्टर क्षेत्रावरील मका पीक धोक्यात सापडले आहे.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा : राज्यातील मका पिकावर ‘अमेरिकन लष्करी अळी’चे संकट आले आहे. ही अळी तासी १०० ते १२० कि.मी. पर्यंतचे अंतर कापत येत असल्याने अळीचा प्रादुर्भावही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्यातील सात लाख ४९ हजार ४७२ हेक्टर क्षेत्रावरील मका पीक धोक्यात सापडले आहे. त्यात सध्या निर्माण झालेले ढगाळ वातावरण या अळीसाठी पोषक ठरत असल्याने शेतकऱ्यांनी या अळीची धास्ती धरली आहे.
राज्यात एक कोटी १८ लाख ८८ हजार १९० हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची पेरणी पूर्ण झाली आहे. सरासरीच्या तुलनेत ८० टक्के पेरणी राज्यात झाली आहे. त्यामध्ये सात लाख ४९ हजार ४७२ हेक्टर क्षेत्रावर मका पिकाचा पेरा आहे. यंदा मका पिकाची पेरणी जास्त करण्यात आली असून, नियोजनानुसार सुमारे १०२ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. परंतू सध्या मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे. अमेरिका, आफ्रिका असा प्रवास करत आलेल्या अमेरिकन लष्करी अळीचे संकट सध्या सर्वत्र जाणवत आहे. अमेरिकेमधून आलेली ही अळी ३० तासामध्ये ३ हजार ६०० कि.मी.चे अंतर कापत आहे; त्यानुसार एका तासाला १२० कि.मी. प्रवासाचा टप्पा गाठत असल्याने मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव वेगात वाढत आहेत. मका पिकावर प्रामुख्याने पडणारी ही अळी इतर पिकांसाठीही धोकादायक ठरत आहे. अळीने मका पिकावर सर्जिकल स्ट्राइक केले असले तरी त्यास लढा देण्यासाठी कृषी विभागाकडून तसेच कृषी विद्यापीठांतर्गत उपाययोजना करण्यावर भर दिला जात आहे. किडीचा नायनाट करण्यासाठी प्रभावी जनजागृती करत योग्य कीड व्यवस्थापनावर भर देण्याची गरज असल्याचे मत कृषी शास्त्रज्ञांकडून व्यक्त होत आहे.
कृषी शास्त्रज्ञांची चमू बांधावर
मका पिकांवर पडणाºया अमेरिकन लष्करी अळीचे संकट गंभीर आहे. अमेरिका, आफ्रिका नंतर या अळीने भारतात प्रवेश केला आहे. सतर्कता म्हणून कृषी शास्त्रज्ञांची टीम प्रत्यक्ष शेत शिवारामध्ये फिरून मका पिकाची पाहणी करताना दिसून येत आहे. तसेच गावोगावी शेतकºयांचे मेळावे घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यावरही भर दिला जात आहे. गत दोन वर्षापूर्वी कपाशी पिकावर बोंडअळीने हल्ला केला होता. त्याहीपेक्षा अधिक पटीने आता लष्करी अळीने मका पीक फस्त केले जात असल्याने कृषी शास्त्रज्ञांची चमू बांधावर पोहचल्याचे दिसून येत आहे. शेतात एकरी दोन फेरोमन ट्रॅप फ्रजीपदरा ल्युअर्ससह लावण्यात येत आहेत.
मोठा पाऊस फायद्याचा
सध्या ढगाळ वातावरण व कुठे रिमझिम पाऊस आहे. त्यामुळे हे हवामान मका पिकावरील लष्करी अळीला फायद्याचेच ठरत आहे. लष्करी अळी मका पिकाच्या पोंग्यामध्ये राहत असल्याने मोठा पाऊस आल्यास या पोंग्यात पाणी साचून अळी मरू शकते. त्यामुळे सध्या मोठा पाऊसच या अळीला नष्ट करण्यासाठी फायद्याचा ठरू शकतो, असे मत कृषी शास्त्रज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
काय म्हणतात कृषी शास्त्रज्ञ
लष्कळी अळी पडण्यामागे बियाण्याचा कुठलाच संबंध नाही. कुठल्याही बियाण्यावर ही अळी पडू शकते. या किडीचे पंतग एका ठिकाणावरून दुसºया ठिकाणी जातात. बाहेरच्या देशातून आलेली ही अळी ३० तासामध्ये ३६०० किमी अंतर कापते. अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने सध्या उपाय म्हणून एका साध्या पंपाला कोराजन चार मि.ली. फवारणी करावी. सोबतच फोरोमन ट्रॅप लावणे आवश्यक आहे.
- डॉ. सी. पी. जायभाये
कृषी शास्त्रज्ञ, बुलडाणा.