"ओळखपत्र दिसेल असे लावा, विचारणा झाल्यास दाखवा"; सरकारी कार्यालयासाठी निर्देश
By ब्रह्मानंद जाधव | Published: October 13, 2023 01:29 PM2023-10-13T13:29:43+5:302023-10-13T13:30:36+5:30
अन्यथा कारवाई : शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांना ओळखपत्र अनिवार्य
सिंदखेडराजा : प्रत्येक शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या जवळील ओळखपत्र अभ्यागतांना दिसेल असे लावणे व विचारणा झाल्यास ते दाखवणे अनिवार्य आहे. या संबंधी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून सर्व शासकीय कार्यालयांना सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आता शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र लावले नाही, तर त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
याच संदर्भात ७ मे २०१४ रोजी राज्य शासनाने परिपत्रक काढले होते. त्यात ओळखपत्र दिसेल, असे लावणे व ओळख पटविण्यासाठी ते विचारणा झाल्यास दाखविणे अनिवार्य केले होते. मात्र या सूचनांची अमलबजावणी होताना दिसत नसल्याने राज्य सरकारने १० ऑक्टोबर रोजी पुन्हा एक परिपत्रक काढले आहे. राज्य सरकारच्या सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयात असताना त्यांचे ओळखपत्र दिसेल, असे लावणे गरजेचे आहे. दरम्यान, ओळखपत्राच्या कारणावरून अनेक ठिकाणी वाद होतात. हे वाद व यासंदर्भातील नागरिकांच्या तक्रारी टाळण्यासाठी सरकारने या सूचना पुन्हा दिल्या आहेत. या सूचनांची अंमलबजावणी करण्यात दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांनी कारवाई करावी, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी पोलिसांनी त्यांचे ओळखपत्र तपासावे ओळखपत्र दर्शनी भागात नसल्यास त्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची नाव सबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मासिक अहवाल वरिष्ठांना पाठवावा असेही निर्देश देण्यात आले आहेत.
प्रत्येक शासकीय कार्यालयात पोलीस असतात?
प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या बाहेर सुरक्षेसाठी पोलिस कर्मचारी असतात असे गृहीत धरून राज्यसरकारने कार्यालयात प्रवेश करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची ओळखपत्र तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय वगळता अन्य कोणत्याच कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलिस तैनात नसतात. त्यामुळे पोलीस नसलेल्या ठिकाणी ओळखपत्राची ओळखपरेड कोण करणार असा प्रश्न आहे.
सिंदखेडराजात कुठे अंमलबजावणी कुठे कानाडोळा
शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांना ओळखपत्र अनिवार्य असतानाही या नियमांचे सिंदखेड राजा येथे कुठे अंमबजावणी, तर कुठे कानाडोळा केला जात असल्याचे दिसून येते. सिंदखेड राजा येथील तहसिल कार्यालय, पंचायत समिती, नगर पालिका यासह इतर शासकीय कार्यालयांमध्ये मोजकेच अधिकारी सध्या ओळखपत्र लावताना दिसून आले.