वृक्षारोपण यशस्वी करा
By admin | Published: July 7, 2017 12:12 AM2017-07-07T00:12:20+5:302017-07-07T00:12:20+5:30
नामदार भाऊसाहेब फुंडकर यांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शहर हिरवेगार करण्यासाठी शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या वृक्ष लागवड मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा, एक घर..एक झाड आणि एक मूल एक झाड, ही संकल्पना साकार करण्यासाठी सहकार्य करा, असे भावनिक आवाहन राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी केले.
शासनाच्या ‘एकच लक्ष चार कोटी वृक्ष’ लागवडीच्या उपक्रमांतर्गत १ ते ७ जुलै वनसप्ताहानिमित्त येथील नगर परिषदमध्ये आयोजित ३ हजार वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून आ.अॅड. आकाश फुंडकर, नगराध्यक्ष अनिता डवरे, उपनगराध्यक्ष मुन्ना पुरवार, मुख्याधिकारी धनंजय बोरीकर, उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर पाणीपुरवठा सभापती सतीशआप्पा दुडे, आरोग्य सभापती राजेंद्र धनोकार, शिक्षण सभापती सौ.संतोष शेखर पुरोहित, महिला व बालकल्याण उपसभापती सरला कावणे, भाजप शहर अध्यक्ष संजय शिनगारे, ज्येष्ठ साहित्यिक रामदादा मोहिते, शेखर पुरोहित, दर्शनसिंह ठाकूर, वसुंधरा फाउंडेशनचे अध्यक्ष सागर फुंडकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष राम मिश्रा, पप्पुसेठ अग्रवाल, महिला आघाडीच्या जान्हवी कुळकर्णी आदींची उपस्थिती होती.
यावेळी ना. फुंडकर म्हणाले, की खामगाव शहरात हरितपट्टा निर्माण केला गेला पाहिजे. यासाठी प्रत्येक नगरसेवकाने आपापल्या वार्डात शंभर झाडे लावण्याचे उद्दिष्ट हाती घेवून पूर्ण करावे. त्याचबरोबर त्यांचे संगोपन करून त्यांना जगवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच मतदारसंघाचे युवा आ.अॅड. आकाश फुंडकर म्हणाले, की भावी पिढीच्या संरक्षणासाठी वृक्ष लागवड करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी नगर परिषदेमार्फत शहरात टार्गेट बसेवर वृक्ष लागवडीचे कार्यक्रम राबवून शहरात लवकरच हरितपट्टा विकसित केला जाईल.
तसेच लागवड करण्यात आलेले वृक्ष जगविण्याच्या हेतूने तीन वर्षांपर्यंत नगर परिषदेकडून या झाडांचे संगोपन व देखरेखीच्या कामाकरिता स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.
या मोहिमेत नागरिकांनी सहभाग घेऊन वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाला लोकचळवळ बनवून, हे कार्यक्रम यशस्वी करावे, असे आवाहन केले. नगराध्यक्ष अनिता डवरे यांनी मार्गदर्शन करताना नगर परिषदेकडून वृक्ष लागवडीबाबत शहरातील सर्व शासकीय संस्था, सामाजिक संघटना, शाळा - महाविद्यालयांना वृक्ष लागवडीबाबत सूचना देण्यात आल्या असून, वृक्ष लागवडीचे कार्य नगर परिषदेकडून अगत्याने सुरू असल्याचे सांगितले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी येत्या एक महिन्यात तीन हजार वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट पूर्ण करू आणि त्यांचे संगोपन करून त्यांना जगवून दाखवू, असा संकल्प केला. संचालन अॅड. बाबू भट्टड यांनी केले.
आभार नगर परिषद विभाग प्रमुख झनके यांनी मानले. यावेळी माजी नगरपालिका उपाध्यक्ष वैभव डवरे यांच्यावतीने ना. फुंडकरांना हिरवळीचे महत्त्व पटवून देणारे स्केच भेट देण्यात आले. या कार्यक्रमाला वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य, नगरसेवक, नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांसह पालिकेतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तीन हजार वृक्ष लागवड महिनाभरात पूर्ण करू- मुख्याधिकारी
शासनाच्या चार कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत खामगाव नगर परिषदेला तीप हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट येत्या महिनाभरात पूर्ण करू आणि या सर्व झाडांचे योग्य संगोपन करून, त्यांना जगवून दाखवू, असा संकल्प यावेळी नगर परिषद मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी केला.