माळवंडी दरोड्यातील तिसरा आरोपी जेरबंद; पोलिस मुख्य आरोपीच्या मागावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 06:45 PM2018-04-05T18:45:03+5:302018-04-05T18:45:03+5:30
बुलडाणा : माळवंडी येथील सराफा व्यापार्याच्या घरावरील दरोडा प्रकरणात लुटलेल्या ११ लाख रुपयांच्या मुद्देमाल हस्तगत करण्याच्या दृष्टीने रायपूर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने हालचाली सुरू केल्या आहेत. पोलिसांच्या एका पथकाने या दरोड्यातील तिसऱ्या आरोपीस चिखली तालुक्यातील धानोरी येथून गुरूवारी सकाळी अटक केली आहे. तीन एप्रिल रोजी अटक करण्यात आलेल्या सुभाष रायभान शिंदे याचा अटक करण्यात आलेला तिसरा दरोडेखोर सतिश (२०) हा मोठा भाऊ आहे. दरम्यान, पोलिसांचे एक पथक सध्या मुख्य आरोपींच्या मागावर असून आणखी दुसरे एक पथक ही रात्री उशिरा जाणार असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. माळवंडी येथे २५ मार्च रोजी सराफा व्यापारी राजू कव्हळकर यांच्या निवासस्थानी दरोडेखोर्यांनी दरोडा टाकून सुमारे साडेदहा लाख रुपयांचे सोनेच्या दागिने, नगदी ३५ हजार रुपये आणि महिलांच्या अंगावरील सोने लुटून त्यांना मारहाण करीत पोबारा केला होता. या प्रकरणात पोलिसांनी तीन एप्रिल रोजी मध्यरात्री सैलानी येथून राजू दिनकर सुरोशे (२४, रा. सैलानी) आणि सुभाष रायभान शिंदे (रा. धानोरी, ता. चिखली) यांना ताब्यात घेतले होते. त्यांना दहा एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावणत आली आहे. दरम्यान तिसरा आरोपी सतिश रायभान शिंदे यासही धानोरी गावातून सकाळी ताब्यात घेतले आहे. पोलिस कोठडीत प्रारंभीच्या दोन आरोपींनी दरोड्यामध्ये सहभागी अन्य आरोपींचीही नावे सांगितली असून दरोडा कशा पद्धतीने टाकला याची हकिगतही कथन केली आहे. अटक आरोपींनी दाखवला होता रस्ता अटक करण्यात आलेल्या या दोघांनी दरोडेखोरांना रस्ता दाखवला होता. प्रकरणाची सांगड घालत पोलिसांनी सैलानी येथून या दोघांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, या प्रकणात अद्याप चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले नसले तरी रायपूर पोलिस दरोड्यातील अन्य आरोपींच्या मागावर आहेत. लवकरच त्यांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश येईल, असे ठाणेदार जे. एन. सय्यद यांनी लोकमतशी बोलताा सांगितले.
आणखी एक पथक
मुख्य आरोपींच्या शोधासाठी रायपूर पोलिसांचे आणखी एक पथक लवकरच रवाना होणार आहे. मात्र ते नेमके कोणत्या दिशेला किंवा गावात जाणार आहे ही बाब पोलिसांनी गोपनीय ठेवली असून दरोड्यातील आरोपींची संख्याही तपासाच्या दृष्टीने अडचणीची ठरू नये म्हणून सांगण्याचे पोलिसांनी टाळले आहे. प्रकरणात लुटलेले सोनेही पोलिस लवकरच हस्तगत करतील, असेही पोलिस सुत्रांनी सांगितले.