मलकापूर : राष्ट्रीयकृत बँकांसमोर मोठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 04:13 PM2020-04-07T16:13:44+5:302020-04-07T16:14:16+5:30
शहरातील राष्ट्रीयकृत बँकांसमोर मात्र सद्यस्थितीत मोठी गर्दी नजरेस पडत आहे
- मनोज पाटील
मलकापूर : सर्वत्र लॉक डाऊन असतानाही शहरातील राष्ट्रीयकृत बँकांसमोर मात्र सद्यस्थितीत मोठी गर्दी नजरेस पडत आहे.अनुदानाचे हजार रुपये काढण्यासाठी संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेचे अपंग, विधवा, व ६५ वर्षावरील वयोवृद्ध लाभार्थ्यांची ही गर्दी आहे. बंदमुळे कुणाला पैशाची अडचण आहे तर कुणाला औषध आणायला पैसे नाहीत अशी गर्दीतील लोकांची व्यथाही समोर आली.
संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील अपंग, विधवा व ६५ वर्षावरील वयोवृद्ध यांना मिळणारे प्रतिमाह हजार रुपये अनुदान सद्यस्थितीत त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. सदर अनुदानाचे पैसे काढण्याकरिता या लाभार्थ्यांची शहरातील व ग्रामीण भागातील राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखेसमोर एकच गर्दी करीत आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीचे सर्वत्र सावट आहे अशा परिस्थितीत सर्व प्रशासकीय यंत्रणा कोरोनाला रोखण्याकरिता युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे.
लाभार्थी रांगेत उभे असले तरी त्यांच्यामध्ये जे सुरक्षित असे सामाजिक अंतर असावे ते मात्र दिसून आले नाही. त्यामुळे जिवाच्या भीतीपेक्षाही त्यांना पोटाची भूक मोठी होती की आपले अनुदान मिळवण्याकरिता त्यांना परिस्थितीचे गांभीर्य नसावे ? अशी वास्तव परिस्थिती या गर्दीमुळे दिसून आली. गर्दीमुळे बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मध्ये भीतीचे वातावरण पसरले असुन बँकेच्या आत सोशल डिस्टन्स ठेवले जात आहे मात्र बाहेर कसल्याच प्रकारचे सोशल डिस्टन्स असल्याचे दिसत नाही.
या गर्दीतील लाभार्थ्यांना तुम्हाला कोरोनाची भीती नाही का ? असा प्रश्न सुरक्षित अंतर ठेवून केला असता, भीती तर आहे आम्हाला! पण आमच्या दैनंदिन गरजेचे करायचे तरी काय? भीतीने आमची गरज भागणार आहे का? असा प्रश्नही काहींनी उपस्थित केला. त्यासंदर्भात इतरांशी चर्चा केली असता कुणाला घरात गहू, तांदळा शिवाय इतर लागणारे साहित्य आणण्याकरिता पैसे नाहीत. तर कुणाला औषधाला पैसे नाहीत. काही लोकांनी गहू, तांदूळ, साखर, चहा पावडर तर आणून दिली पण बाकीचे साहित्य तर आम्हालाच उपलब्ध करायचे आहे ना ! पैसे नाहीत तर ते येणार तरी कुठून? त्यामुळेच आमच्या खात्यात आलेले पैसे आम्ही काढून लगेच घरी जाऊ असे उत्तरही काही लाभार्थ्यांनी दिले. दरम्यान लाॅक डाऊनमुळे त्यांना उद्भवलेल्या अडचणी सुद्धा प्रकर्षाने समोर आल्या. (प्रतिनिधी)