मलकापूर शहर पोलिस निरिक्षकांची प्रकृती बिघडली; वरिष्ठ त्रास देत असल्याचा पत्नीचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 10:55 PM2018-12-18T22:55:40+5:302018-12-18T23:04:41+5:30
व्हीडीओ व्हायरल: वरिष्ठांच्या दबावामुळे प्रकृती बिघडल्याचा पत्नीचा आरोप
खामगाव : मलकापूर शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक प्रदीप ठाकूर यांना सोमवारी सांयकाळी हृदयविकाराचा झटका आला. सद्यस्थितीत त्यांच्यावर जळगाव खांदेश येथे उपचार सुरू असून, वरिष्ठांच्या दबावामुळे आपल्या पतीची तब्येत बिघडल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने एका व्हीडीओतून केला आहे. मात्र, त्याचवेळी या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचा दावा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केलेत. दरम्यान, या प्रकारामुळे पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
मलकापूर शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक प्रदीप ठाकूर यांची प्रकृती बिघडली. वरिष्ठांसमोर त्यांची प्रकृती बिघडल्याने, त्यांना तातडीने मलकापूर येथील डॉ. फिरके यांच्या रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांची ब्लड प्रेशर व इसीजी तपासणी करण्यात आली. दोनवेळा इसीजी काढण्यात आले. त्यानंतर सोमवारी सायंकाळीच ठाकूर यांना जळगाव खांदेश येथे हलविण्यात आले. दरम्यान, वरिष्ठ अधिकारी असलेले अप्पर पोलिस अधीक्षक श्याम घुगे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी गिरीश बोबडे यांच्या दबावामुळे आपल्या पतीची प्रकृती खालावल्याचा आरोप ज्योती प्रदीप ठाकूर यांनी केला आहे. यासंदर्भात ज्योती ठाकूर यांचा बाईट असलेला व्हीडीओ सोशल मिडीयात व्हायरल झाला असून, या व्हीडीओमुळे पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे. दरम्यान, ठाकूर यांची खामगाव येथील कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
ठाकूर यांचे मलकापूर येथे काढण्यात आलेले दोन्ही इसीजी नॉर्मल आहेत. जळगाव येथेही त्यांचा इसीजी नॉर्मल निघाला असून, तज्ज्ञांनीच हा निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे ठाकूर यांच्या पत्नीच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. केवळ वरिष्ठांवर दबाव आणण्यासाठी हा प्रयत्न असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
- गिरीश बोबडे
उपविभागीय पोलिस अधिकारी, मलकापूर
खामगाव येथील शिवाजी नगर पोलिस स्टेशनचा पदभार असताना ठाकूर कामचुकार पणा करायचे. त्यामुळे आपल्या अहवालावरून त्यांना मुख्यालयी पाठविण्यात आले होते. त्यानंतर कामकाज सुधारेल या उद्देशाने त्यांना मलकापूर येथे संधी देण्यात आली. मात्र, तिथेही त्यांची वर्तणुकीत सुधारणा दिसून आली नाही. त्यामुळे वरिष्ठांना यासंदर्भात अहवाल सादर केल्याने, हा प्रकार घडला.
- श्याम घुगे
अप्पर पोलिस अधीक्षक, खामगाव.