बुलडाणा जिल्ह्यात स्मार्ट कार्ड नोंदीत मलकापूर आगार आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 12:14 PM2019-08-14T12:14:34+5:302019-08-14T12:15:00+5:30
मलकापूर आगारामध्ये ३ हजार ५२० जेष्ठ नागरिकांची नोंदणी करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: एसटीच्या कॅशलेस प्रवासासाठी प्रवाशांना लागणाऱ्या स्मार्ट कार्डकरीता डेपोनिहाय नोंदणी करण्याचे काम सुरू आहे. एका आगरांतर्गत दिवसाला जवळपास ५० नोंदी करण्यात येत आहेत. स्मार्ट कार्डसाठी जेष्ठ नागरिकांची नोंदणी करण्यामध्ये जिल्ह्यात मलकापूर आगार आघाडीवर दिसून येत आहे.
एसटी महामंडळाने आधुनिकतेकडे वाटचाल केली असून आता कॅशलेस व्यवहाराकडे एसटीचा प्रवास वळला आहे. एसटीचा प्रवास कॅशलेस करण्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटीच्या ७१ व्या वर्धापनदिनी केली होती. कॅशलेस व्यवहारासाठी अवश्यक असणाºया स्मार्ट कार्ड देण्याच्या अनुषंगाने एसटी महामंडळाच्या बुलडाणा विभागात सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात येणाºया बुलडाणा, चिखली, खामगाव, शेगाव, मेहकर, मलकापूर, जळगाव जामोद या सातही आगारांतर्गत स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करण्याचे काम सध्या सुरू आहे. एका आगरामध्ये सरासरी ५० जेष्ठ नागरिकांची नोंदणी करण्याचे काम दिवसाला होत आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात स्मार्ट कार्डसाठ सर्वाधिक नोंदणी ही मलकापूर आगारामध्ये झाल्याची माहिती आहे. मलकापूर आगारामध्ये ३ हजार ५२० जेष्ठ नागरिकांची नोंदणी करण्यात आली आहे. तर दुसºयास्थानी बुलडाणा आगार असून येथे २ हजार ४७७ जेष्ठ नागरिकांनी नोंद केली आहे. चिखली आगारात १ हजार ४६१ जेष्ठ नागरिक, जळगाव जामोद येथील आरामध्ये १ हजार ७९६, खामगावमध्ये १ हजार ७१८, मेहकरमध्ये १ हजार १९ नोंदणी झाली आहे. सर्वात कमी नोंदणी शेगाव आगारामध्ये झाली आहे. शेगावमध्ये केवळ ६५२ जेष्ठ नागरिकांनी नोंद केली आहे. स्मार्ट कार्डसाठी झालेली ही नोंदणी केवळ जेष्ठ नागरिकांची असून विद्यार्थ्यांची नोंदणी वेगळी आहे.