वाईनबार मालकाच्या जाचाला कंटाळून इसमाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 04:11 PM2020-08-01T16:11:47+5:302020-08-01T16:12:41+5:30
आरोपींविरोधात गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेहास हात लावणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: पोलिसात केलेली तक्रार परत घेण्यासाठी वाईनबार मालक आणि त्याच्या साथीदाराने तगादा लावला. त्यामुळेच आपल्या वडिलांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची तक्रार मृतक इसमाच्या मुलाने शिवाजी नगर पोलिसात केली. त्यानंतर शिवाजी नगर पोलिसांनी कृष्णा भाकूर, करण ठाकूर आणि जयसिंग ठाकूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक महाकाल चौकातील पुंडलिक जांभे यांनी शिवाजी नगर पोलिस स्टेशनला परिसरातील सिंगम वाईन बारमुळे परिसरातील रहिवाशांना त्रास होत असल्याची तक्रार विविध ठिकाणी केली होती. शिवाजी नगर पोलिसातही तक्रार दिली होती. त्यामुळे बारचे संचालक कृष्णा ठाकूर, करण ठाकूर आणि जयसिंग ठाकूर रा. सतिफैल यांनी तक्रारी मागे घेण्यास दबाव आणला होता. जिवे मारण्याची धमकीही दिली होती. त्यामुळे दबावात येऊन माझे वडिल पुंडलिक जांभे यांनी २६ जुलै रोजी विषारी द्रव्य प्राशन केले. त्यानंतर त्यांना सुरूवातीला खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती अत्यवस्थ झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे हलविण्यात आले. तेथे ३१ जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला, अशी तक्रार गणेश पुंडलिक जांभे याने शिवाजी नगर पोलिसात दिली. त्यानंतर शिवाजी नगर पोलिसांनी तिघांविरोधात भादंवि कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. यावेळी नातेवाईकांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेहास हात लावणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली.