खामगाव तालुक्यातील २१ गावांचा नागरिकांचा पाणीप्रश्न मिटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 03:46 PM2019-09-11T15:46:31+5:302019-09-11T15:46:46+5:30
मन प्रकल्पात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तब्बल ५६ टक्के जलसाठा झाला आहे.
- देवेंद्र ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : तालुक्यातील शिर्ला नेमाने येथील मन प्रकल्पात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तब्बल ५६ टक्के जलसाठा झाला आहे. यामुळे या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या २१ गावातील नागरिकांचा पाणीप्रश्न मिटला आहे.
खामगाव तालुक्यातील शिर्ला परिसतील मन प्रकल्पावरून २१ गाव पाणीपूरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत परसिरातील लाखनवाडा, आंबेटाकळी, शिर्ला, कंचनपूर, बोथा, बोरी, अडगाव, आसा, दूधा, चिंचपूर, फतेपूर, गवंढाळा, उमरा, अटाळी, कदमापूर, घारोड, आकोली, जयराम गड, पेडका, शहापूर अशा २१ गावांना पाणीपूरवठा करण्यात येतो. गतवर्षी सुरूवातीपासूनच अतिशय कमी पाऊस झाला. परिणामी नदी-नाल्यांना पूर गेले नाहीत. खरीपाचा हंगाम धोक्यात येण्याबरोबरच पिण्याचे पाण्याचे दर्भिक्ष्यही जाणवले. प्रत्येक गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. मन प्रकल्पाअंतर्गत पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या २१ गावांची पाणी परिस्थिीतीही गतवर्षी अत्यंत बिकट बनली होती. परिसरात दुसरे कोणतेही पाण्याचे मोठे स्त्रोत उपलब्ध नसल्याने या योजनेच्या भरवश्यावरच या परिसरातील नागरीकांची तहान आहे.
परंतु यावर्षी सुरूवातीपासूनच चांगला पाऊस झाल्याने सध्याच ५६ टक्के जलसाठा झाला आहे. विशेष म्हणजे गतवर्षी संपुर्ण पावसाळा संपुनही प्रकल्पात केवळ ३० टक्केच जलसाठा झाला होता. त्यामानाने यावर्षी सध्याच दुप्पट जलसाठा उपलब्ध झाला आहे.
परिणामी येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची भीती नाही. परिसरातील नागरीकांना यावर्षी भरपूर पाण उपलब्ध राहणार आहे. वास्तविक पाहता, केवळ साडेसहा टक्के जलसाठ्याच्या भरवश्यावरच परिसरातील नागरिकांची तहान भागते. त्यामानाने यावर्षी प्रचंड जलसाठा झाल्याने पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनाचा प्रश्नही मिटला आहे.
सिंचनासाठी उपलब्ध होणार पाणी!
मन प्रकल्पावर २१ गावांची तहान अवलंबून असल्यामुळे या प्रकल्पातून एरव्ही सिंचनासाठी देण्यात येणारे पाणी गतवर्षी बंद करण्यात आले होते. त्यामुळे रब्बीचे पिक घेणाऱ्यांना शेतकऱ्यांना पिक वाचविताना कसरत करावी लागली होती. परंतु यावर्षी दमदार पाऊस पडल्याने प्रकल्पात भरपूर पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे येणाºया रब्बी हंगामासाठी शेतकºयांना प्रकल्पातून पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यावर्षी निसर्गाने कृपा केल्याने सध्याच प्रकल्पात ५६ टक्के जलसाठा झाला आहे. आणखी पावसाळा बाकी असल्याने जलसाठयात वाढच होईल. पिण्याच्या पाण्यासोबत सिंचनाचाही प्रश्न मिटणार आहे.
-चंद्रशेखर देशमुख
शाखा अधिकारी, सिचंन शाखा शिर्ला.