बोरखेड नदीत साखरखेर्डा येथील एक जण वाहून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 12:46 PM2020-09-16T12:46:22+5:302020-09-16T12:46:45+5:30
पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने दिलीप वैराळ हे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले तर अन्य तीन शिक्षक सुखरूप आहेत.
बुलडाणा: येथील ग्रामीण पोलिस ठाण्यातंर्गत येत असलेल्या व ज्ञानगंगा अभयारण्याच्या पट्ट्यात असलेल्या बोरखेड येथील नदीत साखरखेर्डा येथील एक जण बेपत्ता झाला आहे. दरम्यान, त्याच्या समवेत असलेले तीन शिक्षक थोडक्यात बचावले आहेत. सध्या घटनास्थळी पोलिस व ग्रामस्थांसह बचाव पथकाचे कर्मचारी पोहोचले असून बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे.
सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील जिजामाता विद्यालयाचे पुरुषोत्तम मानतकर, अशोक गवई आणि कुवरसिंग राजपूत हे शिक्षक आणि दिलीप वैराळ हे चौघे बोरखेड येथे १५ सप्टेंबर रोजी आले होते. कुवरसिंग राजपूत यांचे हे गाव आहे. दरम्यान तरोडा येथील त्यांच्या मित्रांनाही ते भेटले होते. तसेच ज्ञानगंगा अभयारण्यात असलेल्या पलढग प्रकल्प पाहण्यासाठी हे चौघेही गेले होते. दिवसभर तेथे थांबल्यानंतर सायंकाळी बोरखेड येथे महादेव मंदिरालगत वाहणाºया नदीत हे चौघेही आंघोळ करण्यासाठी गेले होते. त्यावे पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने दिलीप वैराळ हे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले तर अन्य तीन शिक्षक सुखरूप आहेत. ही घटना १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर बुलडाणा ग्रामीण पोलिस ठाण्याचे कर्मचारी व ग्रामस्थ हे घटनास्थळी पोहोचले होते. मात्र दिलीप वैराळ यांचा शोध लागू शकला नव्हता. सध्या ते बेपत्ता असल्याचे ठाणेदार सारंग नवलकार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सध्या ग्रामस्थ, पोलिस व बचाव पथक त्यांचा शोध घेत आहेत.दरम्यान, बेपत्ता असलेले दिलीप वैराळ हे साखरखेर्डा येथील जिजामाता विद्यालयावर शिपाई म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे.