खासगी बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 02:12 PM2020-02-26T14:12:14+5:302020-02-26T14:12:38+5:30
हा अपघात २५ फेब्रुवारी रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास मेरा खुर्द फाट्याजीक घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंढेरा: भरधाव वेगात खासगी प्रवासी बस चालवून दुचाकीस्वारास धडक देत त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अंढेरा पोलिसांनी अकोला येथील एमएच-१२-एनबी-५५०५ क्रमांकाच्या बसच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात २५ फेब्रुवारी रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास मेरा खुर्द फाट्याजीक घडला.
या अपघातामध्ये दुचाकीवरील (क्र. एमएच-२८-झेड-४१०३) नागेश राजाराम भवरे (३५, रा. मकरध्वज खंडाळा) हा व्यक्ती ठार झाला आहे. २४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री अंढेरा पोलिस ठाण्यातील एएसआय सुरेंद्र शेळके व एसएसआय बरडे हे रात्र गस्तीवर होते. दरम्यान २५ फेब्रुवारी रोजी पहाटे अडीचच्या सुमारास मेरा खुर्द फाट्यानजीक अपघात झाल्याची माहिती त्यांना अंढेरा पोलिस ठाण्यातून मिळाली. त्या आधारावर दोघेही मेरा खुर्द येथे पेट्रोल पंपानजीक अपघास्थळी पोहोचेल असता एमएच-१२-एबी-५५०५ क्रमांकाच्या खासगी प्रवासी बसने दुचाकीस्वार नागेश राजाराम भवरे यांना धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सोबतच दुचाकीचा अक्षरश: चुराडा झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रकरणी घटनास्थळाचा पंचानामा करून त्यांनी लगोलग मृत नागेश राजाराम भवरे यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.
या प्रकरणी खासगी प्रवासी बस चालक रविंद्र गजानन लोखंडे (३२, रा. खडकी, अकोला) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.