‘मनोधैर्य’ला निधीचा आधार नाही!
By admin | Published: February 4, 2016 01:42 AM2016-02-04T01:42:37+5:302016-02-04T01:42:37+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील अनेक प्रस्ताव पडून; शासनाकडे ८0 लाख रुपयांची मागणी.
बुलडाणा: पीडित, अत्याचारित महीला व बालकांचे मनोबल खचू नये, त्यांना समाजात प्रतिष्ठा व जगण्याचा आधार मिळावा, यासाठी राज्य शासन अशा पीडित, शोषित महिला व बालकांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत करीत असते. बुलडाणा जिल्ह्यात अशा लाभार्थ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणावर असताना, या योजनेमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून निधी नसल्यामुळे मनोधैर्य योजना ठप्प झाली आहे. महिलांवरील अत्याचार, बालकांचे लैंगिक शोषण, महिलांवर अँसिड हल्ला करणार्या गुन्हेगारांना गंभीर शिक्षा देत असतानाच या गुन्ह्यातील पीडित महिला व बालकांना समाजात प्रतिष्ठा व आत्मविश्वास पूर्णपणे मिळवून देणे हे तितकेच आवश्यक आहे. पीडित महिला व बालकांना समाज वेगळ्या नजरेने पाहतो. हे टाळण्यासाठी आणि अशा महिला व बालकांना शारीरिक, मानसिक आघातातून बाहेर काढण्यासाठी शासन त्यांना वित्तीय साहाय्य करते. याशिवाय त्यांचे समुपदेशन, निवारा, वैद्यकीय व कायदेशीर मदत आदी आधार सेवा तत्पर उपलब्ध करून देऊन त्यांचे पुनर्वसन करते. एका लाभार्थ्याला दोन लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला जातो. बुलडाणा जिल्ह्यात मागील वर्षी ६0 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले होते. यावर्षी मात्र मनोधैर्य योजनेमध्ये पैसाच नसल्यामुळे या योजनेतील वाटप ठप्प झाले आहे. महिला व बाल विकास विभागाकडे जवळपास ४0 लाभार्थींचे प्रस्ताव पडून असून, त्यांच्यासाठी ८0 लाख रुपयांचा निधी आवश्यक आहे. मागील आठ महिन्यांपासून मनोधैर्य योजनेवर निधी न आल्यामुळे लाभार्थींना वाटप ठप्प झाले आहे.