Maratha kranti Morcha : खामगावात कडकडीत बंद, दुकाने बंद, शाळा महाविद्यालयांना सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:08 PM2018-07-24T12:08:56+5:302018-07-24T12:10:32+5:30
खामगाव : सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला खामगाव शहरातील व्यापारी, किरकोळ विक्रेत्यांनी प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली.
खामगाव : सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला खामगाव शहरातील व्यापारी, किरकोळ विक्रेत्यांनी प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली. तर खबरदारी म्हणून शाळा महाविद्यालयांनाही सुटी देण्यात आली आहे.
सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी महाराष्ट बंदची हाक देण्यात आली. समस्त मराठा समाज हा कायमच सर्वांच्या संकटसमयी संरक्षकाच्या भुमीकेत राहिला आहे. यास इतिहास ही साक्ष आहे. त्यामुळेच कोणताही विरोध न करता शहरातील किरकोळ विक्रेते, व्यापाºयांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून पाठींबा दर्शवला. सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातून रॅली काढून बंदचे आवाहन करण्यात आले. त्याआवाहनाला खामगावकरांनी प्रतिसाद दिला. सकाळी १० वाजता खामगाव येथील बसस्थानक चौकात दुकाने बंद करण्याच्या कारणावरून गोंधळ निर्माण झाला होता. मात्र पोलिसांच्या सकर्ततने अनर्थ टळला. ही रॅली शहरातील प्रमुख मार्गाने फिरून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहचली. येथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. एक मराठा लाख मराठा, काकासाहेब अमर रहे, तुमचे बलिदान व्यर्थ जाणार नाही अशाप्रकारच्या घोषणा दिल्या. यानंतर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी देवेंद्र देशमुख, संजय शिनगारे, प्रविण कदम यांच्यासह शेकडो सकल मराठा बांधव उपस्थित होते.
खामगांवात कॉंग्रेसचा जाहिर पाठींबा
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदला खामगांवात माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी खामगांव मतदार संघातील समस्त कॉंग्रेस जणांच्या वतीने आपला जाहिर पाठींबा दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरीता जलसमाधी घेतलेल्या हुतात्मा कै.काकासाहेब शिंदे यांनी दिलेले बलिदान व्यर्थ जाणार नाही. फडणवीस सरकार हे आरक्षणविरोधी आहे. जो पर्यंत आपण संघटीत होउन या सरकारचा मुकाबला करणार नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही. महाराष्ट बंदमध्ये सर्वांनी सामील होउन शांततेच्या मागार्ने व संयम पाळुन बंद यशस्वी करावा व कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले आहे.