Maratha Reservation Protest: मलकापूरात आमदारांच्या घरासमोर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 02:46 PM2018-08-03T14:46:09+5:302018-08-03T16:02:26+5:30
मलकापूर: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी भूमिका विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना.चैनसुख संचेती यांच्या निवासस्थानासमोर सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने ३ आॅगस्ट रोजी धरणे देण्यात आले.
मलकापूर: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी भूमिका विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना.चैनसुख संचेती यांच्या निवासस्थानासमोर सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने ३ आॅगस्ट रोजी धरणे देण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी शासन अनुकुल असुन मी सुध्दा आरक्षणाच्या बाजूनेच आहे अशी भूमिकाचैनसुख संचेती यांनी मांडली.
मलकापूर व नांदुरा परिसरातील सकल मराठा समाज बांधवांचे शहरातील छत्रपती शिवराय मराठा मंगल कार्यालयात मोठया संख्येने एकत्रिकरण झाले. या समाज बांधवांनी नंदनवन नगर स्थित आ. चैनसुख संचेती यांच्या निवासस्थानी धडक देत निवासस्थानासमोर ठिय्या दिला. यावेळी समाज बांधवांनी एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय , आमदार साहेब मुह खोलो - सभागृह मे कुछ तो बोलो अशा गगनभेदी घोषणा देत परीसर दणाणून सोडला. दरम्यान समाजातील मान्यवर मंडळीनी समाजाची व्यथा व वेदना प्रकट करीत आरक्षण चा हक्क व गरज यावर भर दिला. यानंतर आ. संचेती यांनी आपली भूमिका मांडली. आरक्षणाबाबत महाराष्ट्र शासन सकारात्मक आहे पण कोणत्याही समाजाला आरक्षण देण्याकरिता कायदेशीर प्रकिया आमलात आणावी लागते. मागासवर्गीय आयोग गठीत केल्याशिवाय व आयोगाने सर्व समाजाचं मत लक्षात घेऊन आयोगाने सूचना केल्याशिवाय शासनाला कायदा स्वरूप चा निर्णय घेता येत नाही. या आयोगाचा अहवाल आॅक्टोंबर महिन्यापर्यंत येईल आणि आॅक्टोबर महिन्यानंतर अधिवेशनामध्ये निश्चितपणे मराठा समाजाला आरक्षण मिळेल. याकरिता आम्ही वचनबद्ध आहोत, अशी स्पष्ट ग्वाही आ. चैनसुख संचेती यांनी दिली.