मराठा वज्रमूठ!
By admin | Published: September 27, 2016 03:28 AM2016-09-27T03:28:01+5:302016-09-27T03:28:01+5:30
बुलडाण्यात मराठा समाजाचा विराट मोर्चा ; आतापर्यंतच्या सर्व मोर्चांचे ‘रेकॉर्ड’ मोडीत.
बुलडाणा, दि. २६- मराठा समाजाचा विराट मोर्चा सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या सर्व मोर्चांचे 'रेकॉर्ड' मोडीत काढलेल्या या अतिविराट आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार लाखो सकल मराठे झाले व मराठय़ांची वज्रमूठ जिल्हावासीयांनी अनुभवली.
आपल्या विविध मागण्यांसाठी लाखोंच्या संख्येने सकल मराठा समाज एकवटून सोमवारी रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसून आले. जिल्ह्यातील मराठा समाजाचे डॉक्टर, वकील, अभियंते यासह विविध विभागातील कर्मचारी मोर्चात सहभागी झाले होते.
शहरात येणार्या प्रत्येक रस्त्यावर आयोजकांनी वाहनतळाची व्यवस्था केली होती. त्या ठिकाणी वाहने ठेवून मराठा समाजबांधव मोर्चाचे ठिकाण जयस्तंभ चौकात दाखल होत होते. जयस्तंभ चौकाला जोडणार्या परिसरातील पाचही मार्ग महिला व पुरुषांनी फुलून गेले होते. यावेळी अनेकांनी आपल्याला हव्या असलेल्या मागण्या मांडल्या. या मोर्चाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मराठा समाज लाखोंच्या संख्येत मोर्चात सहभागी झाला. मोर्चासाठी सकाळी ७ वाजेपासून महिला, महाविद्यालयीन युवती, नागरिक रस्त्यावर उतरले होते. ग्रामीण भागातील सकल मराठा बांधव सकाळी ९ वाजता मोठय़ा प्रमाणात आला. कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी न करता, भाषणबाजीला फाटा देत, शांततेच्या मार्गाने मोर्चा काढण्यात आला.
स्वयंस्फूर्तीने लाखो मराठय़ांचा जनसमुदाय मोर्चात सहभागी झाल्याने, प्रथमच एवढा प्रचंड विराट मोर्चा ठरला. बुलडाणा शहरात पहिल्यांदाच एवढा भव्य मोर्चा निघाला. तसेच गत काही दिवसांपासून या मोर्चाची चर्चा जिल्हाभर असल्यामुळे शहरातील नागरिक हा मोर्चा बघण्यासाठी सरसावले होते.
प्रत्येक घरावर, इमारतींवर तसेच ठिकठिकाणी नागरिक मोर्चा पाहण्यासाठी गर्दी करीत होते. सकाळी ८ वाजतापासून, तर दुपारी ३ वाजेपर्यंत शहरात माणसेच माणसे दिसत होती. दिवसभर मोर्चातील संख्येची चर्चा नागरिकात होती.