‘मराठा विश्वभूषण’ पुरस्कार राजेश टोपे यांना जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 10:01 PM2021-01-03T22:01:47+5:302021-01-03T22:02:42+5:30
Rajesh Tope News मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ना. राजेश टोपे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
बुलडाणा : मराठा सेवा संघाच्या वतीने दिला जाणारा सर्वोच्च ‘मराठा विश्वभूषण’ पुरस्कार यंदा राज्याचे आरोग्यमंत्री राजेशे टोपे यांना जाहीर झाला आहे. १२ जानेवारी रोजी जिजाऊ सृष्टीवर आयोजित करण्यात येणाऱ्या जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात हा पुरस्कार त्यांना मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. कोरोना संसर्गाच्या काळात राज्यातील जनतेला दिलासा देऊन शासकीय आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून सर्वतोपरी सुविधा पुरवत कोरोनावर मात करण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यशस्वी प्रयत्न केले. तसेच आरोग्य यंत्रणेला कोरोना संसर्गाच्या या काळात गुणात्मक व दर्जेदार काम करण्यास त्यांनी प्रेरित केल्याच्या पार्श्वभूमीवर यंदाचा हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे. १२ जानेवारी रोजी सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात हा पुरस्कार मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ना. राजेश टोपे यांना प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी मराठा सेवा संघाचे पदाधिकारी आणि अन्न व अैाषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. हा पुरस्कार आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सहपरिवार उपस्थित राहून स्वीकारणार आहेत. दरम्यान, या सोहळ्याचे प्रक्षेपण सोशल मीडियाद्वारे करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिजाऊ भक्तांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिजाऊ जन्मोत्सव हा आपण आहात त्याठिकाणीच साजरा करावा, असे आवाहनही जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती आयोजन समितीचे प्रसिद्धीप्रमुख विवेक काळे यांनी दिली.