मराठी पत्रकार परिषदेचे अधिवेशन शेगावात
By admin | Published: July 14, 2017 11:54 PM2017-07-14T23:54:22+5:302017-07-14T23:54:22+5:30
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन
शेगाव : स्वातंत्र्यपूर्व काळात १९३७ ला स्थापन मराठी पत्रकार परिषदेच्या ४१ व्या द्वैवार्षिक अधिवेशनाचा बहुमान शेगावला मिळाला असून, येत्या १९ व २० आॅगस्ट रोजी हे अधिवेशन श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात होऊ घातले आहे. यासाठी देशभरातील अडीच हजारावर मराठी माध्यमांचे पत्रकार उपस्थित राहणार असल्याचा अंदाज परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केला. या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल, तर या दोन दिवशीय अधिवेशनासाठी पत्रकारिता क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची उपस्थिती व भरगच्च परिसंवाद आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी मराठी पत्रकार परिषद व बुलडाणा जिल्हा पत्रकार संघ पदाधिकाऱ्यांची पहिली बैठक मंगळवार, ११ जुलै रोजी शेगाव येथे विश्राम भवनात पार पडली. त्यावेळी एस.एम.देशमुख बोलत होते. यावेळी परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, कार्याध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, अकोला जिल्हाध्यक्ष शौकत अली मीर साहेब, वाशिमचे माधवराव अंभोरे, समाधान सावळे प्रामुख्याने हजर होते.