व्यवसाय शिक्षणासाठी आता मराठी विषय अनिवार्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 03:48 PM2019-11-03T15:48:58+5:302019-11-03T15:49:04+5:30

इंग्रजी व इतर माध्यमांच्या शाळांना व्यवसाय शिक्षण घ्यावयाचे असेल तरी सुद्धा मराठी हा विषय अनिवार्य ठेवण्यात आलेला आहे.

Marathi subject is now compulsory for business education! | व्यवसाय शिक्षणासाठी आता मराठी विषय अनिवार्य!

व्यवसाय शिक्षणासाठी आता मराठी विषय अनिवार्य!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय शिक्षण घेण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी दोन व्यवसाय विषयाचे ट्रेड व विद्यार्थी संख्या २५ निश्चित करण्यात आलेली आहे. परंतू यामध्ये इंग्रजी व इतर माध्यमांच्या शाळांना व्यवसाय शिक्षण घ्यावयाचे असेल तरी सुद्धा मराठी हा विषय अनिवार्य ठेवण्यात आलेला आहे.
व्यवसाय शिक्षण आज काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवयासाचेही ज्ञान मिळावे, यासाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियांनातर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांकरिता व्यवयास शिक्षण योजना राबविण्यात येते. शाळांनी व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम सुरू केल्यास विद्यार्थ्यांसाठी विषयनिहाय गुणरचना देण्यात आली होती. त्यामध्ये विद्यार्थ्यांना विषय निवडीचे विकल्पही देण्यात आले होते. २०१५ मध्ये इंग्रजी व्यतिरिक्त इतर माध्यमांच्या विद्यार्थ्यांना द्वितीय भाषेऐवजी व्यवसाय विषय निवडण्याचे व इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना भाषा दोन किंवा भाषा तीन ऐवजी व्यवयास विषय निवडण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा २०१६-१७ पासून सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्र या विषयाऐवजी व्यवसाय विषय निवडण्याची मुभा देण्यात आली. मात्र माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०१९ मध्ये हिंदी, उर्दू आदी माध्यमांच्या काही शाळांनी मराठी विषय वगळून व्यवसाय विषय निवडले. त्यामुळे शासनाच्या मराठी विषय अनिवार्य असल्याच्या धोरणाला बाधा येत असल्याने व्यावसाय विषय निवडण्यात काही बदल करण्यात आलेले आहेत; ज्यामध्ये मराठी विषय अनिवार्य करण्यात आला. त्यामुळे आता मराठी, इंग्रजी किंवा इतर माध्यमांच्या शाळांना व्यवसाय विषय घेण्यासाठी मराठी विषय सुद्धा अनिवार्यच राहणार आहे.


द्वितीय भाषा किंवा सामाजिक शास्त्रांना पर्याय
द्वितीय भाषा किंवा सामाजिक शास्त्रांना व्यवयास शिक्षणाचा पर्याय ठेवण्यात आलेला आहे. त्यानुसार मराठी माध्यमांच्या शाळांना व्दितीय भाषा किंवा सामाजिक शास्त्रे या विषयांऐवजी व्यवसाय विषय निवडता येतील. तर इंग्रजी व इतर माध्यमांच्या शाळांना मराठी विषय अनिवार्य ठेवण्यात आला आहे. मात्र सामाजिक शास्त्रे किंवा अन्य भाषा विषयांऐवजी व्यवसाय विषय निवडता येणार आहेत. एनएसक्युएफ रचनेनुसार तसेच केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सुचनेनुसार दोन व्यवसाय विषयाचे ट्रेड निश्चित करण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय शिक्षण महत्त्वाचे आहे. माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय शिक्षण योजना राबविण्याकरिता विषयांचे विकल्प देण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रथम भाषा मराठी हा विषय अनिवार्य आहे, ही बाब शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची आहे.
- अमोल तेजनकर, जिल्हाध्यक्ष, राज्य खा. प्रा. शिक्षक संघटना बुलडाणा.

 

Web Title: Marathi subject is now compulsory for business education!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.