विदर्भाच्या पाण्यावर मराठवाड्याचा डोळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:35 AM2021-07-31T04:35:14+5:302021-07-31T04:35:14+5:30
खकडपूर्णा प्रकल्पातील पाण्याचा सर्व लाभ हा विदर्भातीलच शेतकरी घेत आहेत. असा सूर आळवत जाफराबाद व भोकरदन तालुक्यातील सिंचनासाठी लिफ्ट ...
खकडपूर्णा प्रकल्पातील पाण्याचा सर्व लाभ हा विदर्भातीलच शेतकरी घेत आहेत. असा सूर आळवत जाफराबाद व भोकरदन तालुक्यातील सिंचनासाठी लिफ्ट इरिगेशनने पाणी देण्याची मागणी मराठवाड्यातून होत आहे. जाफराबाद तालुक्यातील पाळ शिवारातील डोंगराळ भागात लिफ्ट इरिगेशनव्दारे पाणी आणल्यानंतर तेथून कालव्याव्दारे जाफराबाद व भोकरदन तालुक्याला सिंचनाची सोय करण्याचा मनसुबा याअंतर्गत रचण्यात आला आहे. वस्तुत: खकडपूर्णा जलयाशयातून मराठवाड्यातील भोकरदन आणि सिल्लोडसाठी यापूर्वीच पिण्याचे पाणी आरक्षित केलेले आहे. यासह बुलडाणा, देऊळगावराजा, सिंदखेडराजा, मेरा बु. व देऊळगावमही या गावांसाठी पिण्याचे पाणी आरक्षित आहे. सिंचनाच्या आरक्षणाचे वाटप झालेले आहे. आरक्षणानुसार प्रकल्पात काहीच शिल्लक उरत नसताना आणि लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची सिंचनासाठीची मागणी प्रलंबित असताना जिल्ह्याच्या हक्काचे पाणी पळविण्यासाठी मराठवाड्यात मोर्चेबांधणी सुरू आहे. ज्यांच्या जमिनी या प्रकल्पात गेल्या. गावे बुडाल्याने ज्यांना विस्थापित व्हावे लागले, असे शेतकरी व नागरिक या प्रकल्पातील पाणी मिळावे, यासाठी झगडत आहेत. परंतु त्यांना ते मिळत नाही. अशा स्थितीत प्रकल्पातील पाणी पळविण्यात मराठवाड्यातील कुरापती नेते यशस्वी झाल्यास सर्वात जास्त हानी बुलडाणा जिल्ह्याची होणार असल्याने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व सर्वपक्षीयांनी पुन्हा एकदा हक्काच्या पाण्यासाठी पक्षभेद न पाळता एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे.
आरक्षणाचे वितरण पूर्ण
खकडपूर्णा प्रकल्पातील पाण्याच्या आरक्षणाचे वितरण झालेले आहे. या आरक्षणानुसार प्रकल्पात काहीच शिल्लक उरत नाही. उलट आरक्षणानुसार पाणी मिळत नसल्याने पाण्याचा तुटवडा जाणवतो. असे असताना या धरणातील पाणी पळविण्याचा घाट मराठवाड्यातील नेत्यांनी पुन्हा एकदा घातला आहे.
खकडपूर्णाचे पाणी आरक्षण!
१६० दलघमी क्षमतेच्या खकडपूर्णा प्रकल्पातून ४० दलघमी पाणी पिण्यासाठी आरक्षित आहे. देऊळगावराजा ६५, सिंदखेडराजा ९ आणि चिखली तालुक्यातील २६ असे एकूण १०० गावांतील २० हजार ७२० हेक्टर सिंचन क्षेत्र आहे.
खकडपूर्णा पाणीवापर तपशील
खकडपूर्णा प्रकल्पाच्या चतुर्थ सुप्रमा अंतर्गत एकूण १६० दलघमीपैकी ७४.९९ दलघमी सिंचनासाठी, ४.७७ दलघमी पिण्यासाठी, ३.१० दलघमी औद्योगिक वापर आणि ३१.२६ दलघमी पाणी बाष्पीभवन याप्रमाणे आरक्षित आहे. याचे एकूण ११४.२२ दलघमी इतके आहे. तर भूजलाव्दारे सिंचनासाठी ३७.९७ आणि एकूण वार्षिक वापर १५२.१९ इतके आहे.