घरकुलांच्या हप्त्यांसाठी सिंदखेड राजा पालिकेत मोर्चा, रक्ताने लिहिलेली दिली निवेदने
By संदीप वानखेडे | Published: July 11, 2023 05:00 PM2023-07-11T17:00:38+5:302023-07-11T17:01:10+5:30
घरकुलाचे हप्ते वर्ष उलटूनही मिळत नसल्याने संतप्त घरकूल लाभार्थी राजवाडा येथून पालिकेपर्यंत आले.
सिंदखेड राजा : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरात अनेक घरकुले बांधली गेली तर अनेक घरकुले प्रगतिपथावर आहेत. मात्र, शेकडो घरकूल लाभार्थ्यांना अद्याप घरकुलाचे नियमित हप्ते मिळाले नसल्याने संतप्त घरकूल लाभार्थ्यांनी मंगळवारी पालिका कार्यालयावर मोर्चा काढला. गेल्या तीन महिन्यांत हा दुसरा मोठा मोर्चा आहे.
घरकुलाचे हप्ते वर्ष उलटूनही मिळत नसल्याने संतप्त घरकूल लाभार्थी राजवाडा येथून पालिकेपर्यंत आले. राहिलेले हप्ते त्वरित मिळावे, यासाठी अनेक लाभार्थ्यांनी रक्ताने निवेदन तयार करून ते पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आले. सध्या पेरणीची कामे सुरू आहेत. बियाणे, औषधी खर्च, शाळांमध्ये मुलांचे प्रवेश, त्यांची पुस्तके, साहित्य आदींसाठी लागणारा पैसा जोडताना सामान्य नागरिकांची अडचण होत आहे. त्यातच घरकुलाचे हप्ते लांबल्याने शहरातील शेकडो घरांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
हप्ते त्वरित मिळावे, यासाठी याही पेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना कैलास नारायण मेहेत्रे, श्याम मेहेत्रे, लक्ष्मण ढवळे, छगन काळे, अरुण जोगी, जगन्नाथ जोगी, बाबासाहेब जाधव, कैलास सातपुते, सखाराम असोलकर, संजय पाठक, संदीप तायडे यांच्यासह महिला, पुरुष लाभार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.