खामगाव येथे ओबीसी समाज बांधवांचा मोर्चा; मराठा समाजाला ओबीसींमध्ये समाविष्ट करण्यास विरोध
By अनिल गवई | Published: September 12, 2023 01:05 PM2023-09-12T13:05:27+5:302023-09-12T13:05:42+5:30
खामगाव येथील उपविभागीय कार्यलयावर धडक दिल्यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या शिष्टमंडळाने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर केले.
खामगाव: मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करू नये, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी मंगळवारी दुपारी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने खामगावात भव्य मोर्चा काढण्यात आला. स्थानिक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या मोर्चाला दुपारी १२ वाजता सुरूवात झाली. प्रमुख मार्गावरून हा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला. यावेळी तीव्र निदर्शनेही करण्यात आली.
खामगाव येथील उपविभागीय कार्यलयावर धडक दिल्यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या शिष्टमंडळाने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर केले. या निवेदनात नमूद केले की, मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करू नये. कोणत्याही परिस्थितीत मराठा जात लिहिलेल्या मराठा समाजातील व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र देऊ नये. जरांगे पाटलांच्या ओबीसीकरणाला राष्ट्रीय ओबीसी महासंघाने तीव्र विरोध दर्शविला. यासोबतच महाराष्ट्र शासनाने बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वेक्षण करावे. ओबीसी विद्यार्थ्यांकरीता प्रत्येक जिल्ह्यात मुला मुलींकरीता स्वतंत्र वसतीगृह व स्वधार योजना सुरू करावी.
५२ टक्के ओबीसींना ५२ टक्केआरक्षण देण्यात यावे. देशात ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची शिफारस महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. या निवेदनावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबन तायवाडे, अनिल अमलकार, रवि महाले, जयेश भिसे, सुरज बेलोकार, बळीराम वानखडे यांच्यासह ओबीसी समाज बांधवांच्या स्वाक्षरी आहेत. या मोर्चात आेबीसी महासंघाचे पदाधिकारी व कार्यकतेर् मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.