बाजार समित्यांच्या निवडणुका पुढील आर्थिक वर्षात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:28 AM2021-01-02T04:28:43+5:302021-01-02T04:28:43+5:30
जिल्ह्यात एकीकडे ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे. या निवडणुकाही गेल्या एक वर्षापासून रखडल्या होत्या. त्यातच येत्या काळात आता ...
जिल्ह्यात एकीकडे ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे. या निवडणुकाही गेल्या एक वर्षापासून रखडल्या होत्या. त्यातच येत्या काळात आता दोन नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहे, अशातच सहकार क्षेत्रातील निवडणुकांचे काय, यासंदर्भाने माहिती घेतली असता ही बाब समोर आली आहे.
वास्तविक बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर, मोताळा, सिंदखेड राजा या बाजार समित्यांची निवडणूक ही सातपेक्षा अधिक वर्षांपासून रखडलेली आहे. उर्वरित शेगाव वगळता अन्य बाजार समित्यांचाही कालावधी संपलेला आहे.
२२८ सहकारी संस्थांच्या संचालकांचीही संपतेय मुदत
बाजार समित्यांसोबतच जिल्ह्यातील २२८ सहकारी संस्थांची मुदत संपत असल्याने २०२१ मध्ये या संस्थांच्या निवडणुकाही घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र त्यादृष्टीनेही राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण (पुणे) यांच्याकडून अद्याप कुठलीही स्पष्टता आलेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यात प्रामुख्याने पतसंस्था, खरेदी-विक्री संघ, ग्रामसेवा सोसायट्यांसह अन्य सहकारी संस्थांच्या निवडणुका होणे क्रमप्राप्त आहे. या निवडणुकाही पुढील आर्थिक वर्षातच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणुकांसाठी अवाश्यक निधीसंदर्भातही अद्याप काही हालचाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.