शेतकरी संपामुळे बाजार समितीत शुकशुकाट!

By admin | Published: June 2, 2017 12:55 AM2017-06-02T00:55:50+5:302017-06-02T00:56:56+5:30

स्वाभिमानी, शेतकरी संघटना, अडते व्यापारी, हमाल कामगारांसह काँग्रेसचा पाठिंबा

Market committee suspicion due to farmers' strike! | शेतकरी संपामुळे बाजार समितीत शुकशुकाट!

शेतकरी संपामुळे बाजार समितीत शुकशुकाट!

Next

चिखली : शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या पाहता शेतकऱ्यांनी १ जूनपासून संपावर जाण्याची भूमिका घेतली आहे. या संपाला तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या संपामुळे चिखली बाजार समितीत शुकशुकाट पहावयास मिळाला. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवित या संपाला स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना, जिल्हा काँग्रेस कमिटी, व्यापारी व अडत असोसिएशन, हमाल मापारी संचालक यांनी पाठिंबा दर्शविल्याने शहरात शेतकऱ्यांचा संप यशस्वी ठरत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या या संपाचा भाजीपाला मार्केटवरही परिणाम दिसून आला. भाजीपाला बाजारात केवळ शेतकरी संपाविषयी माहिती नसलेले शेतकरीच तुरळक प्रमाणात दाखल झाले होते. शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती पाहता व शेतकरी आत्महत्येचे प्रमाण पाहता त्या समस्या व शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत योग्य कृतीशील उपाययोजना न झाल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी १ जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संपकाळात शहरात विकला जाणारा भाजीपाला, दूध तसेच शेतमाल न विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १ जून रोजी राज्यभरातील शेतकरी हे आंदोलन यशस्वीपणे राबवित आहेत. याच धर्तीवर चिखली शहरात १ जून रोजी कोणत्याही प्रकारचा शेतमाल व दूध दाखल झाले नाही. परिणामी, चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवसभर सर्वत्र शुकशुकाट होता, तर येथील दूध संकलन केंद्रातही नियमितपणे दूध घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्यामुळे दूध संकलन केंद्रसुद्धा बंद होते. दरम्यान, शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झाला पाहिजे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात याव्यात, शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, या मागण्यांसाठी राज्यभरातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या संपाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हा उपाध्यक्ष विनायक सरनाईक, नितीन राजपूत, दीपक सुरडकर, विलास तायडे, भारत वाघमारे, गोपाल ढोरे, भरत जोगदंडे यांनी, शेतकरी संघटनेचे समाधान कणखर, व्यापारी व अडत असोसिएशनच्यावतीने असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, तर हमाल मापारी संचालक गजानन पवार यांनी पत्र देऊन पाठिंबा दिला आहे, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना या संपात सक्रिय सहभागी झाली आहे.

शेतकरी संपाला काँग्रेसचा पाठिंबा - आ. राहुल बोंद्रे 
राज्यासह जिल्ह्यातील शेतकरी चौफेर संकटाने घेरला असताना त्याला तातडीची आवश्यक मदत देण्याऐवजी पोकळ योजनांचा मारा तथाकथीत संवाद यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर केला जातो आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांशी या यात्रेतून कसलेही सोयरसुतक नसल्याचे शेतकऱ्यांना ढळढळीतपणे दिसत असताना संकटात असलेल्या शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’चे डमरू वाजवून भुलविण्याचा धंदा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे़; मात्र भ्रमनिरास झाल्याने राज्यातील व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कधी नव्हे ते संपाचे हत्यार उपसले आहे. त्याला बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीने जाहीर पाठिंबा दिला असून, शेतकऱ्यांच्या या आंदोलनात जिल्हाभरातील काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संपूर्ण आंदोलनाला सहकार्य करीत उत्स्फूर्त सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांनी केले आहे़ 

दूध व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी सहकार्य करावे - विनायक सरनाईक
शेतकऱ्यांची सद्यस्थिती पाहता शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा आहे, तसेच अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्यांची सोडवणूक व्हावी, यासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांनी हा संप पुकारला आहे. या संपाची दखल शासनाला घ्यावीच लागणार आहे; परंतु याबाबत अनेक शेतकरी अनभिज्ञ आहेत, तर अनेक विघ्नसंतोषी व शेतकऱ्यांच्या नावावर आपली पोळी भाजून घेणाऱ्यांनी हा संप हाणून पाडण्याचा डाव रचाला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी जागरूक राहावे व या संपात दूध व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनीही सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष विनायक सरनाईक यांनी केले आहे.

Web Title: Market committee suspicion due to farmers' strike!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.