बुलडाणा जिल्ह्यातील बाजारातील बैठक वादाच्या भोवऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 02:45 PM2018-09-03T14:45:39+5:302018-09-03T14:46:09+5:30
बुलडाणा: नागरी भागांचा वाढता विस्तार पाहता जिल्ह्यातील शहरी भागातील आठवडी बाजारातील बैठक व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासोबतच त्याचा विस्तार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
बाजारात पोलिस तैनात: बैठक व्यवस्थेच्या कारणावरून हातगाडीवाल्यांची धावपळ
बुलडाणा: नागरी भागांचा वाढता विस्तार पाहता जिल्ह्यातील शहरी भागातील आठवडी बाजारातील बैठक व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासोबतच त्याचा विस्तार करण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, या समस्येमुळे बुलडाणा येथील बाजारात पोलिस, हातगाडीवाले तथा भाजीपाला विक्री करणाºयांमध्ये नेहमीच वादाचे प्रसंग ओढावत आहे. बाजारातील बैठक वादाच्या भोवºयात अडकल्याने फेरीवाला धोरणाची शहरी भागात प्रभावी अंमलबजावणीची आवश्यकता दिसून येत आहे.
बुलडाणा येथील बाजार हा केवळ शहरापुरताच मर्यादीत नसून जिल्ह्यासाठी महत्वाचा आहे. येथे कापड मार्केट मोठे असल्याने बुलडाण्यासह चिखली, मेहकर लोणार, सिंदखेड राजा, मोताळा, मलकापूर तालुक्यातील नागरिकही रविवारच्या दिवशी बुलडाणा बाजारामध्ये येतात. पोलिस अधिक्षक कार्यालयासमोरुन गेलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजुला व मध्यभागी कापड विके्रते आपले दुकान थाटतात. त्यात हातगाडी वाल्यांची गर्दी वेगळीच. त्यामुळे या रस्त्याने ग्राहकांना चालणे अवघड होते. हातगाडी वाले रस्त्यावर गाड्या लावत असल्याने व त्याचठिकाणी भाजीपाला विक्रेते बसत असल्याने या रस्त्याने एकही वाहन जावू शकत नाही. रस्त्यावरील ही कोंडी मोकळी करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून नेहमी प्रयत्न करण्यात येतात; मात्र हातगाडीवाले व पोलिस यांच्यामध्ये वाद होण्याचे प्रकार घडत आहेत. त्याचबरोबर हातगाडीवाले व भाजीपाला विक्रेते यांच्यामध्येही बैठक व्यवस्थेच्या कारणावरून रविवारच्या दिवशी वादाचे प्रसंग घडातात. बाजारातील वादाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस प्रत्येक ठिकाणी तैनात करण्यात आल्याचे दिसून येत आहे. हातगाडीवाले व भाजीपाला विक्रेते रस्त्याच्या मध्यभागी बसू नये, यासाठी थोड्या-थोड्या वेळाने पोलिसांचे वाहन या रस्त्याने फिरते. परंतू पोलिसांचे वाहन जाताच पुन्हा या रस्त्यावर विक्रेत्यांची गर्दी जमते. हातगाडीवाले व इतर विक्रेत्यांची संख्या वाढली असल्याने बैठक व्यवस्था अपूरी पडत असल्याचे दिसून येत आहे.
एकाच व्यक्तीचे अनेक दुकाने
बैठक व्यवस्थेसाठी परवानगी एका ठिकाणची काढून एकाच व्यक्तीचे चार ते पाच ठिकाणी दुकाने दिसून येतात. त्यामुळे इतरांना जागा मिळत नाही. शिवाय ग्रामीण भागातून येणाºया भाजीपाला विक्रेत्यांनाही काही स्थानिक हातगाडीवाले बसू देत नसल्याचा प्रकारही येथे होतो. त्यामुळे वादाचे प्रामाण वाढते.
‘गाडी आली पळापळा’...
रस्त्याच्या मध्यभागी हातगाडीवाले आपले दुकान थाटत असल्याने पोलिसांची गाडी बाजाराच्या रस्त्यावरून फिरते. परंतू पोलिसांची गाडी आली की, हातगाडीवाले एकमेकांना लगेच सतर्क करून रस्त्याच्या बाजुला हातगाडी पळवतात. त्यामुळे पोलिसांचे वाहन दिसताच ‘गाडी आली पळापळा’... असे शब्द या हातगाडीवाल्यांच्या तोंडून येथे ऐकायला मिळतात.
वाहने उभी करण्याचा प्रश्न
बुलडाण्याच्या बाजारामध्ये इतर तालुक्यातूनही लोक येत असल्याने ग्राहकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होते. परंतू येणाºया ग्राहकांना आपली मोटारसायकल व इतर वाहने लावण्यास मोठी अडचण येते. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सध्या वाहने उभी करण्यात येतात. मात्र त्याठिकाणी सुद्धा वाहने लावण्यासाठी जागा कमी पडत असल्याचे दिसून येते.