ओढणीने गळा आवळून विवाहितेचा खून
By admin | Published: April 4, 2017 12:29 AM2017-04-04T00:29:39+5:302017-04-04T00:29:39+5:30
साखरखेर्डा येथील २६ वर्षीय महिलेला ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून पतीने ठार मारल्याची तक्रार तिच्या आईने ३ एप्रिल रोजी साखरखेर्डा पोलीस स्टेशनला दिली.
सिंदखेड राजा : सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील २६ वर्षीय महिलेला ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून पतीने ठार मारल्याची तक्रार तिच्या आईने ३ एप्रिल रोजी साखरखेर्डा पोलीस स्टेशनला दिली. या तक्रारीवरून पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत साखरखेर्डा येथील मुजफ्फर हुसेन यांच्या मोठ्या मुलीचे लग्न चिखली येथील मो.इरफान अ.रहेमान (बबलू) यांच्यासोबत झाले होते. त्यांना दोन अपत्य असून, साखरखेर्डा येथेच मुजफ्फर हुसेन यांच्या वाड्यातील एका खोलीत राहत होते. १ एप्रिल रोजी बबलू हा मद्य प्राशन करून घरी आला आणि दरवाजा बंद करून साझीया हिला बेदम मारहाण करू लागला. पती-पत्नीचे भांडण सोडविण्यासाठी साझीयाची आई हसिना गेली असता तिलाही जीवे मारण्याची धमकी दिली. हसिना ह्या मदतीसाठी इतर नातेवाईकांना हाक मारण्यासाठी गेल्या असता त्यावेळात मो.इरफान याने साझीयाचा गळा आवळून तिला ठार मारले आणि फरार झाला. मुजफ्फर हुसेन यांना घटनेची माहिती मिळताच घरी आले आणि तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. १ एप्रिलला दवाखान्यातून परस्पर मृतदेह हा घरी नेण्यात आला. रात्रभर प्रेत घरातच होते. सकाळी नातेवाईक जमा झाल्यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यातच बबलू याला प्रथम अटक करा, असा पवित्रा संतप्त महिलांनी घेतला. २ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता मर्ग दाखल करुन प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यात विवाहितेच्या अंगावर मारल्याच्या जखमा आढळून आल्या आणि गळ्याभोवती फास आवळल्याची खून आढळून आली. २ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजता मृतकाचा दफनविधी पार पडला. ३ एप्रिल रोजी मृतकाची आई हसिना हुसेन यांच्या तक्रारीवरून आरोपी मो.इरफान याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.