सासरच्या जाचाला कंटाळून चांदुरबिस्वा येथील विवाहितेची पुण्यात आत्महत्या
By विवेक चांदुरकर | Updated: November 27, 2023 17:15 IST2023-11-27T17:15:00+5:302023-11-27T17:15:51+5:30
पती,सासू व सासऱ्यास अटक: सुसाइड नोट पाठवली नातेवाइकांना.

सासरच्या जाचाला कंटाळून चांदुरबिस्वा येथील विवाहितेची पुण्यात आत्महत्या
विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मलकापूर : चांदुरबिस्वा सासर असलेल्या विवाहितेने पुणे येथे सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना २५ नोव्हेंबर रोजी घडली. विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून सासु, सासरे व पती विरूध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना पुणे येथे अटक करण्यात आली आहे.
विवाहितेचे वडील रमेश रामभाऊ चोपडे (वय ५३) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, त्यांची मुलगी दीक्षा हिचा विवाह ८ मे २०२१ रोजी नांदुरा तालुक्यातील चांदूरबिस्वा येथील पवन प्रल्हाद तायडे याच्याशी झाला होता. लग्नानंतर मुलगी दीक्षा रक्षाबंधनाला माहेरी आली असता तिने पती व सासू-सासरे यांनी काही दिवस चांगली वागणूक दिली. मात्र आता ते त्रास देतात. पती मारहाण करून त्रास देतो असे सांगितले. त्यानंतर मुलीला मे २०२२ मध्ये मुलगा झाला. मुलाच्या खर्चासाठी माहेरून पैसे आण असे म्हणून मुलीला त्रास देणे सुरूच ठेवले. त्यानंतर मार्च-एप्रिल २०२३ मध्ये मुलीने फोन करून सांगितले पती पवन तायडे नवीन फ्लॅट घेण्याकरीता माहेरून १० लाख रूपये आणण्याचा तगादा लावत आहे. फ्लॅट घेण्यासाठी माहेरवरून १० लाख रूपये आणण्याचा लावण्यात आलेला तगादा, सासरकडील मंडळीच्या इच्छेविरूध्द मुलास जन्म दिला म्हणून नेहमी सासरकडील मंडळीकडून होणारा त्रास व मारहाणीला कंटाळून दीक्षा हिने २५ नोव्हेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तक्ररीत नमुद केले आहे. तिने ३ पानाची सुसाईड नोट लिहून त्यामध्ये सासरकडील मंडळीकडून होणार्या त्रासाबाबत लिहिले आहे. सुसाइड नोट काही नातेवाईकांना सुध्दा पाठविली आहे.
वडिलांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड येथे पती पवन प्रल्हाद तायडे, सासू प्रमिला तायडे, सासरा प्रल्हाद लक्ष्मण तायडे यांच्याविरूध्द कलम ३०४ (ब), ३०६, ४९८ (अ), ३२३, ५०५, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.