विवाहीतेची चिमुकल्यासह विहीरीत आत्महत्या; वाचविण्यास गेलेल्या तरुणाचाही बुडून मृत्यू
By निलेश जोशी | Published: November 7, 2023 07:08 PM2023-11-07T19:08:15+5:302023-11-07T19:09:12+5:30
मायलेकावर एकाच सरणावर अत्यंसस्कार
चिखली (जि. बुलढाणा) : दिवाळसणामुळे सर्वत्र नवचैतन्याचे वातावरण असतानाच तालुक्यातील भरोसा या गावासाठी ६ नोव्हेंबरची रात्र काळरात्र बनून आली. एका २६ वर्षीय विवाहितेने अवघ्या २१ महिन्यांच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या मायलेकांना वाचविण्यासाठी विहिरीत उडी मारलेल्या तरूणाचाही गाळात फसल्याने मृत्यू झाला. या घटनेतील तिघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करतांना ७ नोव्हेंबर रोजी अवघे गावकरी हळहळले.
भरोसा येथील विवाहिता शितल गणेश थुट्टे हिने अवघ्या २१ महिन्यांचा देवांश या चिमुकल्यासह गावातील शेतकरी दिनकर जाधव यांच्या मालकीच्या विहिरीत ६ नोव्हेंबरच्या सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उडी घेऊन आत्महत्या केली. शितल हिने चिमुकल्यासह विहिरीत उडी घेतल्याचे समजताच त्यांच्या वाचविण्यासाठी गावातील सिध्दार्थ निंबाजी शिरसाठ (३६) यांनी विहिरीत उडी घेतली. मात्र, सिध्दार्थ यांचे पाय गाळात फसल्याने त्यांचाही करूण अंत झाला.
सिद्धार्थ शिरसाट हे पट्टीचे पोहणारे होते. परंतू, संध्याकाळची वेळ असल्याने विहिरीत अंधार होता. शिवाय विहिरीतील गाळ असेल याची त्यांना कल्पना नसल्याने त्यांचाही घात झाला. दरम्यान गावातीलच सुखदेव त्र्यंबक थुट्टे (५५) यांनी विहिरीत उडी घेतली होती. सुदैवाने काठावरील ग्रामस्थांनी तातडीने विहिरीत दोर सोडून त्यांना सुखरूप बाहेर काढले. माहिती मिळताच अंढेरा पोलिस निरीक्षक विकास पाटील यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. रात्रीचा अंधार व विहिरीत गाळ असल्याने मृतदेह काढणे जिकरीचे ठरले होते. ७ नोव्हेंबरच्या पहाटे हे तीनही मृतदेह बाहेर काढल्यानंतर तिघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले होते. दुपारी भरोसा येथेही तीनही मृतदेहांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अर्ध्यावरती डाव मोडला
या दुर्देवी घटनेत मृत महिलेचा पती गणेश थुट्टे हा शेती व शेतमजुरी करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करतो. तीन वर्षांपूर्वी त्यांचा शितल सोबत विवाह झाला होता. त्यांच्या संसारवेलीवर देवांशच्या रुपाने फुलही उमलेले होते. घटनेच्या दिवशी दुपारी ३ वाजता चिमुकला देवांश घरासमोर खेळत असल्याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रीत करून शितल यांनी पतीला पाठविला होता. मात्र, शितल यांनी हे टोकाचे टाकाचे पाऊल का उचलले? हे स्पष्ट होऊ शकले नाही.
मायलेकावर एकाच सरणावर अत्यंसस्कार
दुर्घटनेतील तिघांवर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान मृत शितल व निष्पाप चिमुकला देवांश यांच्या पार्थिवावर एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले.