बुलडाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2016 01:08 AM2016-07-05T01:08:21+5:302016-07-05T01:08:21+5:30
नदी, नाल्यांना पूर येऊन अनेक वृक्षांची पडझड झाल्याचे वृत्त.
बुलडाणा : गत दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या काही भागात वरुणराजा बरसत आहे. सोमवारी दुपारी जिल्ह्यात सर्वत्रच मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नदी, नाले वाहले असून, अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे नुकसानही झाले आहे. कमी-अधिक प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे टाकलेले बियाणे जमिनीवर येताना दिसत आहे. जिल्ह्यात ४ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार पावसाची नोंद करण्यात आली. यात बुलडाणा तालुक्यात ३ मिमी, मलकापूर १ मिमी, मोताळा २७ मिमी, नांदुरा ६ मिमी, खामगाव ५.२ मिमी, शेगाव ६ मिमी, जळगाव जामोद ६ मिमी आणि संग्रामपूर तालुक्यात ६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर चिखली, दे.राजा, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा तालुक्यात पाऊस निरंक आहे. १ जूनपासून आतापर्यंत सर्वात जास्त पाऊस २१२ मिमी लोणार तालुक्यात झाला असून, सर्वात कमी पाऊस जळगाव जामोद तालुक्यात ९७ मिमी एवढा नोंदविण्यात आला आहे. जून महिना दमदार पावसाअभावी कोरडाच गेल्याने मेहकर व चिखली तालुका वगळता इतर तालुक्यात पेरण्या खोळंबल्या होत्या. एकूण क्षेत्रफळापैकी फक्त २८ टक्केच पेरण्या जून महिन्यात झाल्या होत्या. त्यामुळे शेतकर्यांना नियमित पाऊस येईल अशी शाश्वती व दमदार पावसाची प्रतीक्षा लागली होती. अखेर जुलै महिना चांगला निघाला असून, ३ जुलै रोजी जिल्ह्यात दमदार पावसाचे आगमन झाले. त्यानंतर आज दुसर्या दिवशीसुद्धा अनेक तालुक्यात चांगला पाऊस झाला. खामगाव तालुक्यात सकाळपासून अधूनमधून रिमझिम सुरू होती. त्यानंतर दुपारी ४.३0 ते ५.३0 वाजेपर्यंत दमदार पाऊस झाला. नांदुरा तालुक्यातही पावसाने दमदार हजेरी लावली. त्याचप्रमाण शेगाव, मलकापूर, संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यातही सर्वत्र रिमझिम पाऊस झाला. पहिलाच दमदार पाऊस असल्याने हा पाऊस जमिनीत मुरता झाला. त्यामुळे पाऊस असतानाही नदी-नाले दुथडी भरुन वाहत असले तरी पूर आल्याचे वृत्त नव्हते.