सामना दुरंगीच होणार, पण मतविभाजन कळीचा मुद्दा; बुलढाण्यात दुरंगी लढत
By निलेश जोशी | Published: April 14, 2024 07:32 AM2024-04-14T07:32:00+5:302024-04-14T07:32:23+5:30
गेल्या सहा निवडणुकांचा इतिहास पाहता, मत विभाजन हा येथे नेहमीच कळीचा मुद्दा ठरला आहे.
नीलेश जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क
बुलढाणा : या मतदारसंघातून सलग तीन वेळा दिल्ली गाठणारे शिंदेसेनेचे प्रतापराव जाधव यांना चौथ्यांदा दिल्लीत जाण्यापासून रोखण्याचे आव्हान उद्धवसेनेचे प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्यासमोर आहे. येथील निवडणूक ही दुरंगी होत असली तरी वंचितचे वसंतराव मगर तसेच रविकांत तुपकर आणि संदीप शेळके या दोन अपक्ष उमेदवारांमुळे होणारे मतांचे विभाजन यावर विजयाचे गणित अवलंबून आहे.
गेल्या सहा निवडणुकांचा इतिहास पाहता, मत विभाजन हा येथे नेहमीच कळीचा मुद्दा ठरला आहे. प्रचाराच्या उत्तरार्धात आता उभय बाजूंनी स्टार प्रचारकांच्या सभांचा धुरळा उडणार असून, अंतिम टप्प्यात वारे कसे फिरते यावरही काही शक्यता अवलंबून आहेत. जिल्ह्यात महायुती प्रबळ असून, सातपैकी सहा आमदार हे महायुतीचे आहेत. त्या तुलनेत मविआचा एकच आमदार आहे. त्यातच ‘गद्दारी विरोधात खुद्दारी’ असा मुद्दा घेऊन उद्धवसेना रिंगणात उतरली आहे. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदा वंचितचा तितकासा जोर दिसत नाही. त्यामुळे ‘वन मिशन’चे संदीप शेळके व रविकांत तुपकर हे अपक्ष उमेदवार कोणाची आणि किती मते खाणार, यावरून विजयाचा गुलाल कुणाच्या अंगावर पडणार, हे निश्चित होणार आहे.
महायुतीत भाजपचे विजयराज शिंदे आणि शिंदेसेनेचे संजय गायकवाड यांच्यातील पूर्वापार चालत आलेल्या वादाचे पडसादही निकालावर पडण्याची शक्यता आहे. दोघांच्या एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपांचा परिणाम मतदारांवर होऊ नये, तसेच त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचे मतविभाजन होऊ नये यासाठी दोन्ही बाजूच्या पक्षश्रेष्ठींनी लक्ष घातले आहे.
जाधवांचीही परीक्षा
प्रतापराव जाधव यांच्यासाठी ही निवडणूक राजकीयदृष्ट्या निर्णायक आहे. गेल्या १५ वर्षांत त्यांनी कोणता विकास केला? असा प्रश्नांचा भडीमार महाविकास आघाडीचे प्रा.नरेंद्र खेडेकर यांच्यासह रिंगणातील अपक्ष विचारत आहेत. चौथ्यांदा जाधव रिंगणात असल्याने त्यांच्या विरोधात असलेली चर्चेतील ॲन्टी इन्कम्बन्सी विरोधकांनी प्रत्यक्षात मतांच्या रूपात पारड्यात पाडून घेतली तर बुलढाण्यात प्रसंगी वेगळा निकाल लागू शकतो. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी बुलढाण्यात सहा वेळा येऊन भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठका घेतल्या होत्या. त्यातून भाजपच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावल्या होता. वेळेवर शिंदे सेनेला जागा गेल्यामुळे नाराज भाजपच्या एका नेत्याने अर्जही दाखल केला होता.
एकूण मतदार १७,६४,०५१
पुरूष - ९,२४,१५८
महिला - ८,३९,८६९
निवडणुकीतील कळीचे मुद्दे -
- खामगाव-जालना रेल्वे मार्ग मंजूर झाला असला तरी तो अद्यापही कागदावरच आहे. प्रत्यक्षात त्याचे काम कधी सुरू होईल याबाबत शाश्वती नाही.
- नदीजोड प्रकल्पाची चर्चा असली तरी प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ शेतकऱ्याला केव्हा होईल?
- जिगाव प्रकल्पही प्रदीर्घ कालावधीपासून रखडलेला आहे. बेरोजगारीसोबतच, औद्योगिक क्षेत्राचा प्रश्न रखडलेला आहे.
२०१९ मध्ये काय घडले?
- प्रतापराव जाधव शिवसेना (विजयी) ५,२१,९७७
- राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादी काँग्रेस ३,८८,६९०
- बळीराम शिरसकार वंचित बहुजन आघाडी १,७२,६२७
- नोटा - ७,६८१
२०१९ पूर्वीच्या निवडणुका
वर्ष विजयी उमेदवार पक्ष मते टक्के
- २०१४ प्रतापराव जाधव (शिवसेना) ५,०९,१४५ ५२%
- २००९ प्रतापराव जाधव (शिवसेना) ३,५३,६७१ ४१%
- २००४ आनंदराव अडसूळ (शिवसेना) ३,६९,९७५ ४९%
- १९९९ आनंदराव अडसूळ (शिवसेना) २,९४,९२२ ४०%
- १९९४ मुकूल वासनिक (काँग्रेस) ३,४८,०९४ ५२%