गणित मांडणा-यांची गोची
By admin | Published: October 7, 2014 11:12 PM2014-10-07T23:12:06+5:302014-10-07T23:31:14+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदारांचा कल अस्पष्ट!
अशोक इंगळे / सिंदखेडराजा (बुलडाणा)
मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदारसंघात नेहमीच जातीचे गणित मांडून निवडणूक लढविणार्यांची यावेळी गोची झाल्याने त्यांच्यावर कसरत करण्याची पाळी आली आहे. यावेळी कोणत्या उमेदवाराच्या झोळीत मतदानाचा कौल पडणार, हे अस्पष्ट आहे.
मातृतीर्थावर भगवा फडकविण्यासाठी, सतत ५ वेळा पराभव होऊनही शिवसेना या मतदारसंघात लढत आहे. गेल्या दोन निवडणुकीत डॉ. शशिकांत खेडेकर पराभूत होऊनही तिसर्यांदा पुन्हा त्यांच्या खांद्यावर शिवधनुष्य आले आहे.
येथील नेहमीचे प्रतिस्पर्धी आ.डॉ. राजेंद्र शिंगणे मैदानात नसल्याने मतदार मोकळा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी रेखाताई खेडेकर यांनी मिळविली आहे. राहीन तर सिंदखेडराजा मतदारसंघातच, हा हट्ट त्यांचा होता. डॉ. शिंगणे यांनी राजवाड्यासमोर त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडला त्यामुळे त्यांना ताकद मिळाली आहे.
काँग्रेस, मनसे, भाजपा या तिन्ही पक्षाच्या उमेदवारांनी डॉ. राजेंद्र शिंगणे यांना उमेदवार समजून आखलेली प्रचाराची रणनीती मोडीत निघाली असून, आता प्रचार करताना विकास आणि पक्षाचे कार्य, यावरच भर द्यावा लागत आहे. मतदारसंघातील वंजारी समाजाची एकगठ्ठा मतांवर अनेकांची नजर आहे. काँग्रेसचे प्रदीप नागरे, भाजपाचे डॉ. गणेश मांटे आणि मनसेचे जि.प. सदस्य विनोद वाघ हे आपआपल्या पद्धतीने प्रचार करीत असले तरी आक्रमक प्रचारापेक्षा उमेदवारांच्या स्वभाव गुणांवर कार्यकर्ते मतदारांसमोर झोळी पसरवित आहे.
वसंतराव मगर हे राष्ट्रवादीतून बहुजन समाज पार्टीच्या हत्तीवर स्वार झाले आहेत. तर दलित समाजाचे नेते पंडितराव खंदारे हेही निवडणूक रिंगणात आहेत. दोघेही डॉ. शिंगणे यांचे कट्टर सर्मथक समजल्या जातात. त्यामुळे जातीच्या फॅक्टरचा या मतदारसंघात बुगदा झाला असून, मतदारांची सहानुभूती हाच एक मुद्दा समोर येत आहे.