मथुरेच्या बासरीची बुलडाण्यात धून...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:33 AM2021-08-29T04:33:15+5:302021-08-29T04:33:15+5:30
बुलडाणा : दोन दिवसावर श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव आला आहे. जन्माष्टमीनिमित्त बाजारात पाळणे, बासरी यासह श्रीकृष्णाच्या पोशाखांची विक्री वाढली आहे. ...
बुलडाणा : दोन दिवसावर श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव आला आहे. जन्माष्टमीनिमित्त बाजारात पाळणे, बासरी यासह श्रीकृष्णाच्या पोशाखांची विक्री वाढली आहे. बुलडाण्यातील बाजारात आलेले श्रीकृष्णाचे अनेक साज हे दिल्ली आणि मथुरा येथून आलेले आहे. त्यामुळे या जन्माष्टमीला बुलडाण्यात मथुरेच्या बासरीची धून ऐकावयास मिळणार आहे.
श्रावण सोमवार, ३० ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जयंती आहे. कोरोनामुळे मंदिर बंद असले, तरी यंदा घरोघरी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात येणार आहे. येथील बाजारामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त वेगवेगळे साहित्य दाखल झालेे. हे साहित्य खरेदी करण्याची लगबग महिलावर्गांमध्ये दिसून येत आहे.
जन्माष्टमीनिमित्त लागणारे साहित्य व दर
पाळणा १५०-१५००
बासरी २०-५०
कंबरपट्टे १००-४००
पोशाख १५-१०००
टोप १०-२००
मोतीमाला १०-२००
शाळा बंदचा साहित्य विक्रीवर परिणाम
शाळा, महाविद्यालयांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा मोठा कार्यक्रम दरवर्षी घेण्यात येतो. या कार्यक्रमात मुलांना श्रीकृष्ण, राधा बनवून शाळेत एक प्रकारचे गोकूळ निर्माण होते.
कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांसाठी खरेदी होणारा श्रीकृष्णाचा साज व इतर साहित्याची यंदा मागणी नाही.
राधा, कृष्णाचा पोशाख विद्यार्थ्यांसाठी भाड्याने दिला जातो. परंतु शाळा बंद असल्याने त्यावरही परिणाम झाला आहे.
कापसाच्या वस्त्रालाही महत्त्व
श्रीकृष्ण पूजनासाठी कापसाच्या वस्त्रालाही अनन्यसाधारण महत्त्व असते. बाजारात वेगवेळे आकार आणि कलाकृतीमध्ये कापसाचे वस्त्र विक्रीसाठी आलेले आहेत.
कापसाचे वस्त्र १५० रुपयांपासून ते ४०० रुपयांपर्यंत आहे.
श्रीकृष्ण जन्मोत्सव आम्ही दरवर्षी साजरा करतो. यंदाही घरातच जन्माष्टमी साजरी करणार आहोत. त्यासाठी संपूर्ण तयारी झाली आहे. श्रीकृष्णाचा पाळणा व इतर साजही खरेदी करण्यात आलेले आहे.
-संध्या निणावणे. भाविक
श्रीकृष्ण जन्मोत्सवाची परंपरा अनेक ठिकाणी जपली जाते. यंदा कोरोनामुळे मंदिर बंद असले, प्रत्येक घरात जन्माेत्सव साजरा होईल. जन्मोत्सवानिमित्त लागणाऱ्या साहित्य खरेदी पूर्ण झाली आहे.
-दीपाली जाधव, भाविक.