मातृतीर्थ तालुक्यातच स्त्री जन्माचे प्रमाण कमी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:14 AM2017-07-19T00:14:08+5:302017-07-19T00:14:08+5:30
एक हजार मुलांमागे फक्त ५२१ मुली
काशीनाथ मेहेत्रे।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : मातृतीर्थ जिजाऊ मासाहेबांच्या तालुक्यातच मुलींच्या जन्मदराचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात एक हजार मुलांच्या जन्मामागे केवळ ५२१ मुली असल्याने मातृतीर्थ नगरीत बेटी बचाओ अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करणे गरजेचे झाले आहे.
पुरुषांच्या जन्मदराच्या तुलनेत स्त्री जातीच्या जन्माचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. आरोग्य क्षेत्रातील सोनोग्राफीचे तंत्रज्ञान विकसित झाले. त्या तंत्रज्ञानामुळे गरोदर स्त्रियांच्या गर्भातील गर्भजल परीक्षण करून सदर गर्भ स्त्री किंवा पुरुष जातीचा आहे, हे समजल्यावर स्त्रीच्या गर्भातील स्त्रीभ्रूणहत्या वाढल्या. सिंदखेडराजा तालुक्यामध्ये चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्या आरोग्य केंद्रांतर्गत किनगावराजा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कमी म्हणजे एक हजार मुलांच्या तुलनेत फक्त ५२१ मुलींचा जन्मदर असून, मानवानेच मानवापुढे निर्माण केलेले मोठे संकट निर्माण झाले. या संकटाला सामोरे जाण्यासाठी आरोग्य विभागाबरोबर सर्व विभागांना जबाबदारी देऊन स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी जनतेला समाज प्रबोधनाची खरी गरज आहे. भारतासारख्या प्रचंड लोकशाही असलेल्या देशात आदिमानवापासून सन २००० सालापर्यंत मुला-मुलींचे प्रमाण सारखे होते.
अपंग, अंध, कुरूप असलेल्या व्यक्तींनासुद्धा त्यांचा जीवनसाथी सहजपणे मिळत असे; परंतु व्यापारी आणि नोकरदारांना चांगले दिवस असल्याने शेतकऱ्यांच्या मुलांना कोणी मुलगी देण्यास तयार होईना. शेती विकावी लागली तरी चालेल; परंतु मुलीचे लग्न नोकरी करणाऱ्या मुलाशीच अशा हव्यासापोटी मुलांना हुंडा देण्याची प्रथा सुरू झाली. ती एवढ्या प्रमाणात वाढली, की मुलीच्या लग्नात लाखो रुपये खर्च येतो, त्यापेक्षा मुलगीच नको, या भावनेतून सुरू झालेली स्त्रीभ्रूणहत्या आणि कुटुंबात मुलाला जन्म दिला तर बरे, अन्यथा कुटुंबात मुलीच जन्माला आल्या, तर त्या सुनेचा किंवा मातेचा मानसिक छळ करून मातेची हत्या, या दुष्टचक्रातून मानवापुढे मोठे संकट निर्माण झाले.
सिंदखेडराजा तालुक्यामध्ये चार प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आडगावराजा, किनगावराजा, मलकापूर पांग्रा, साखरखेर्डा या चार उपकेंद्रांतर्गत असलेल्या गावातील मुला-मुलींच्या जनगणनेच्या प्रमाणात मुलीचा जन्मदर खालावल्याचे दिसते.
मलकापूर पांग्रा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्वात जास्त म्हणजे एक हजार मुलांच्या प्रमाणात ९६३ मुली तर साखरखेर्डा अंतर्गत ९२२ मुली आहेत. आडगावराजा ६७२ मुली तर किनगावराजा सर्कलमध्ये सन १७-१८ सालातील तीन महिन्यांच्या अहवालात एक हजार मुलांमागे फक्त ५२१ मुलींचा जन्मदर चिंताजनक आहे. मातृतीर्थ तालुक्यातच मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी असल्याने ही समस्या गंभीर होत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
समाजप्रबोधनाची गरज
बेटी बचाओ, बेटी पढाओ, नवे पर्व, नवा संकल्प अभियानाचा शासन गाजावाजा करीत आहे. दुसरीकडे गर्भजल परीक्षण करण्यासाठी गुजरात, मध्य प्रदेश राज्यात जाणाऱ्या लोकांची चर्चा दबक्या आवाजात ऐकण्यात येते, तर मुलगी जन्माला आल्यानंतर तिची हेळसांड करून तिला मृत्यूच्या खाईत ढकलण्याचे प्रमाण वाढत आहे. याकरिता शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे व समाजप्रबोधन करणे काळाची गरज आहे.
मुलालाच वंशाचा दिवा न समजता मुलीला वंशाचा दिवा समजण्याची मानसिकता तयार करण्याची गरज आहे.
- डॉ.डी.ए. मान्टे
तालुका आरोग्य अधिकारी, सिंदखेडराजा.