दिव्यांग, मनोरुग्ण, अनाथांसाठी मायेचे छत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:42 AM2021-06-09T04:42:36+5:302021-06-09T04:42:36+5:30
आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रकल्पावर छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या ...
आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रकल्पावर छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण राज्यामध्ये दिव्या फाउंडेशनच्या माध्यमातून दिव्यांग, बेघर, बेसहारा व्यक्तींची सेवा केली जात आहे. मात्र, हे कार्य करत असताना त्यांना कायमचा निवारा उपलब्ध व्हावा, यासाठी दिव्या फाउंडेशनने बुलडाणा-खामगाव रोडवरील वरवंड येथे लोकसहभागातून दिव्य प्रकल्पाच्या उभारणीला सुरुवात केली होती. या प्रकल्पाचे हे बांधकाम पूर्ण झाले असून, रविवारपासून बेघरांच्या या प्रकल्पांतर्गत सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने या प्रकल्पाचे आ. संजय गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. दिव्य फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या समाजकार्याची माहिती घेऊन यापुढे दिव्य प्रकल्पाला लवकरच आमदार निधीतून सभामंडप देण्यात येणार असून, भविष्यातही प्रकल्पाच्या विकास कामासाठी निधी देण्याचे आश्वासन आ. गायकवाड यांनी दिले आहे. यावेळी सोहळ्याच्या निमित्ताने प्रा. गणेश देशमुख यांनी साहित्याच्या स्वरूपात २५ हजार रुपयांची मदत दिली.
दिव्यांग, बेघर आढळल्यास माहिती द्या
दिव्यांग, बेघर, मनोरुग्ण आढळल्यास त्यांनी दिव्या फाउंडेशनच्या दिव्य प्रकल्पामध्ये त्याला आणून द्यावे, अन्यथा दिव्य प्रकल्पाला तशी माहिती द्यावी, असे आवाहनसुद्धा या निमित्ताने दिव्य फाउंडेशनकडून करण्यात आले आहे. यावेळी संस्थेचे चीफ डायरेक्टर आशिष खडसे, योगेश सिंगरकर, सुनील तिजारे, राजेंद्र टिकार, विलास भिसे, आनंद सुरडकर, भीमराव राठोड, वरवंड सरपंच बाळूभाऊ जेउघाले, हेमंतबापू देशमुख, बाळा चव्हाण, राहुल सुरडकर, राजेश टारपे, नंदिनी टारपे, ज्योती गवई, ॲड. वर्षा पालकर, शैलेश खेडकर, स्वप्निल ढवळे, बुलडाणा कट्टाचे सदस्य मंडळ गजानन अवसरमोल, संस्थापक अशोक ककडे दिव्या फाउंडेशन परिवार उपस्थित होते.