खामगाव नगरपालिकेतील मोजमाप पुस्तिका सापडेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 11:32 AM2021-06-24T11:32:14+5:302021-06-24T11:32:19+5:30
Khamgaon municipal counsil : सर्वत्र शोध घेऊनही ही मोजमाप पुस्तिका सापडत नसल्याने बांधकाम विभागातील अधिकारी-कर्मचारी हतबल झाले.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : सिमेंटरस्त्याची अनामत रक्कम काढण्यासाठी खोटे दस्तवेज तयार करण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच, बांधकाम विभागातील मोजमाप पुस्तिका गहाळ झाली आहे. त्यामुळे पालिकेच्या बांधकाम विभागात एकच खळबळ उडाली आहे. सर्वत्र शोध घेऊनही ही मोजमाप पुस्तिका सापडत नसल्याने बांधकाम विभागातील अधिकारी-कर्मचारी हतबल झाले असून, एकाच महिन्यात बांधकाम विभागातील दोन वेगवेगळी प्रकरणे समोर आल्याने मुख्याधिकारी चांगलेच संतप्त झाले आहेत.
खामगाव नगर पालिका हद्दीतील प्रभाग ११ मधील तरण तारण नगरातील नागरी दलित वस्ती सुधार योजनेतंर्गत सिमेंट रस्ता तयार करण्यात आला.
अतिशय निकृष्ट दर्जाच्या रस्त्याची अनामत रक्कम काढण्यासाठी कंत्राटदाराने नगर पालिकेतील अधिकारी आणि कर्मचाºयांना हाताशी धरून खोटे दस्तवेज तयार केले. उल्लेखनिय म्हणजे अंतर्गत लेखा परिक्षकांनी जाणीवपूर्वक ठेवलेल्या ‘गोमी’वर लेखा विभागाने ‘टाच’ लावली.
त्यामुळे प्रकरण वरिष्ठांपर्यंत पोहोचले. त्यानंतर आता बांधकाम विभागातील मोजमाप पुस्तिका क्रमांक ६ गहाळ झाली आहे.
सर्वत्र शोधाशोध केल्यानंतरही ही पुस्तिका सापडत नसल्याने पालिकेच्या बांधकाम विभागात एकच खळबळ उडाली असून, एकाच महिन्यात दोन प्रकरणं समोर आल्याने, मुख्याधिकारी चांगलेच संतप्त झाले आहेत.
याप्रकरणी अधिक माहितीसाठी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, त्यांनी कानावर हात ठेवत, अधिक माहिती देण्याचे टाळले.
एकाच विकास कामाचा दोन हेडखाली समावेश...
स्थानिक नगर पालिकेच्या बांधकाम विभागातील अनागोंदी कारभाराने कळस गाठला आहे. बांधकाम विभागातील फाईल गहाळ, खोटे दस्तवेज तयार करणे, मोजमाप पुस्तिका गहाळ झाल्यानंतर आता एकाच विकास कामाचा दोन वेगवेगळ्या निधीतून समावेश करण्यात आला. साडेचार लक्ष रूपयांच्या विकास कामाचा नगर परिषद निधी आणि रस्ता निधीतंर्गत समावेश करीत खामगाव पालिकेने ई-निविदाही प्रकाशित केली. त्यामुळे खामगाव पालिकेतील बांधकाम विभागात नेमके सुरू तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एकासाठी खटाटोप; दुसऱ्याकडे दुर्लक्ष!
n कंत्राटदाराशी संगनम करून अनामत रक्कम काढण्यासाठी खोटे दस्तवेज तयार करण्यात आले. अर्थपूर्ण व्यवहारातून कंत्राटदाराला मदत करण्यात आली. त्याचवेळी नियमानुसार काम पूर्णत्वास गेल्यानंतरही गत दहा वर्षांपासून दुसऱ्या एका कंत्राटदाराला अनामत रक्कम देण्यासाठी पालिकेकडून चालढकल केली जात आहे.
n ही धक्कादायक वस्तुस्थिती गत महिन्यात घडलेल्या दोन वेगवगळ्या प्रकरणावरून दिसून येते. अनामत रक्कम काढण्यासाठी एका मदत तर दुसऱ्याला त्रास अशी दुहेरी भूमिका पालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकारी घेत असल्याची चर्चा पालिका वर्तुळात होत आहे.
शहरातील विकास कामांसंदर्भात खामगाव पालिकेने ई-निविदा प्रकाशित केली आहे. यामध्ये एका विकास कामाचा दोनवेळा चुकीने समावेश झाला आहे. बांधकाम विभागाकडून यासंदर्भात शुध्दीपत्रक दिले जाईल.
-डी.टी. थोरवे
कार्यालयीन पर्यवेक्षक,
नगर परिषद, खामगाव.