‘पीपीपी’वर आधारित वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार
By admin | Published: April 9, 2016 01:34 AM2016-04-09T01:34:08+5:302016-04-09T01:34:08+5:30
पालकमंत्री खडसे यांची घोषणा.
खामगाव : पीपीपी अर्थात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलवर आधारित वैद्यकीय महाविद्यालय बुलडाणा जिल्ह्यात सुरू करणे शक्य असून, यासाठी जिल्हय़ातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे किंवा अन्य क्षेत्रातील काही मंडळी पुढे आल्यास वैद्यकीय महाविद्यालय जिल्हय़ात सुरू केले जाईल, अशी घोषणा महसूल, कृषी तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी केली. खामगाव येथील एका कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, माजी मंत्री रमेश बंग, खासदार प्रतापराव जाधव, आमदार पांडुरंग फुंडकर, आ. आकाश फुंडकर उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, की या वैद्यकीय महाविद्यालयासाठी शासन ५१ टक्के सहभाग देईल. खासगी क्षेत्राला किंवा व्यक्तींना ४९ टक्के भागीदारी द्यावी लागेल. या महाविद्यालयाच्या उभारणीला शासन पैसा पुरवेल, शासकीय रुग्णालये या महाविद्यालयाला जोडण्यात येतील, तसेच जमीनही शासन देईल. यावेळी डॉ. रणजित पाटील म्हणाले, सामान्य नागरिकांना स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून देण्यासाठी जेनेरिक औषध दुकाने सरकारने सुरू केली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना लाभ होणार आहे.